“मेहनतीला फळ, दुर्लक्षाला धक्का! मनपात भाजप–MIMची मुसंडी, शिवसेना, काँग्रेस–राष्ट्रवादीची नामुष्की”

“मेहनतीला फळ, दुर्लक्षाला धक्का! मनपात भाजप–MIMची मुसंडी, शिवसेना, काँग्रेस–राष्ट्रवादीची नामुष्की”

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद)दि. १६ :-

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवार उभे केले होते. भाजप, शिवसेना (शिंदे गट), काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), AIMIM, वंचित बहुजन आघाडी तसेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी निवडणूक लढवली. मात्र प्रचाराच्या मैदानात मेहनत आणि नेतृत्व यामध्ये प्रचंड तफावत स्पष्टपणे दिसून आली — आणि त्याचाच थेट परिणाम निकालात उमटला.

भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, स्थानिक मंत्री अतुल सावे, खासदार डॉ. भागवत कराड, आमदार संजय केनेकर, शहराध्यक्ष किशोर शितोळे यांच्यासह अनेक दिग्गजांनी प्रचारात अक्षरशः जिवाचे रान केले. प्रत्येक प्रभागात भाजपची यंत्रणा रात्रंदिवस काम करताना दिसली.

दुसरीकडे शिवसेना (शिंदे गट) कडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री संजय शिरसाट आणि आमदार प्रदीप जैस्वाल यांनीही प्रचारात आघाडी घेतली. मर्यादित साधनांतही उमेदवारांसाठी जोरदार प्रयत्न झाले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासाठी खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भव्य सभा झाली. माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली; मात्र या दोन्ही नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे खुद्द खैरे यांनीच उघडपणे मान्य केले. याचा फटका पक्षाला बसल्याचे स्पष्ट झाले.

AIMIM ने मात्र प्रचारात वेगळीच छाप पाडली. ओवेसी बंधूंनी शहरात जाहीर सभा घेतल्या, तर असदुद्दीन ओवेसी यांनी सलग दोन-तीन दिवस पदयात्रा काढत मतदारांशी थेट संवाद साधला. प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनीही प्रत्येक प्रभागात लक्ष घालून संघटनात्मक मेहनत घेतली — आणि याचे फळ AIMIM ला मोठ्या यशाच्या रूपात मिळाले.

याउलट काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे चित्र निराशाजनक राहिले. शहरात उमेदवार अक्षरशः वाऱ्यावर सोडल्यासारखे वातावरण होते. काँग्रेसकडून खासदार कल्याण काळे दोन तीन ठिकाणी सोडून फारसे प्रचारात दिसले नाहीत. मोठ्या नेत्यांपैकी केवळ एक दिवस प्रदेशाध्यक्ष आणि एक दिवस बाळासाहेब थोरात एवढीच उपस्थिती दिसली.

तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चा एकही मोठा नेता शहरात फिरकलाच नाही. अशा परिस्थितीत उमेदवार निवडून येणार तरी कसे, असा प्रश्न मतदारांमध्ये चर्चेचा विषय ठरला.

अखेर निकालानेच स्पष्ट केले —

👉 मेहनत करणाऱ्यांना यश, दुर्लक्ष करणाऱ्यांना अपयश!

📊 अंतिम निकाल

भाजप – 57 जागा

AIMIM – 33 जागा

शिवसेना (शिंदे गट) – 13 जागा

शिवसेना (उबाठा) – 6 जागा

वंचित बहुजन आघाडी – 4 जागा

काँग्रेस – 1 जागा, राष्ट्रवादी शरदपवार पक्ष 1

ही निवडणूक एकच धडा देऊन गेली — मैदानात उतरून 

रात्रंदिवस झटणाऱ्यांनाच मतदारांनी कौल दिला!

राजकारणात केवळ नाव नव्हे, तर मेहनतच निर्णायक ठरते.