मार्टि कार्यान्वित होण्याची चिन्हे स्पष्ट! – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटनाची प्रतीक्षा
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. ३ :- राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था (MRTI) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पुढील टप्प्याला आता वेग येण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.
संस्थेच्या नोंदणीसाठी आणि भविष्यातील कार्यआराखडा निश्चित करण्यासाठी शासनाने 31 ऑक्टोबर 2025 रोजी शेख रशिदोद्दीन शमशोद्दीन यांची सल्लागार (Advisor) म्हणून नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती सामान्य प्रशासन विभागाच्या 10 जून 2025 च्या शासन निर्णयातील अटींनुसार करार पद्धतीने करण्यात आली आहे. शेख रशिदोद्दीन हे सेवानिवृत्त विशेष लेखा परीक्षक (वर्ग-1), सहकारी संस्था या पदावरून निवृत्त झालेले अधिकारी आहेत.
MOA–AOA तयार करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी
मार्टि संस्थेची नोंदणी कंपनी कायद्याअंतर्गत करण्यासाठी आवश्यक असलेली MOA (Memorandum of Association) आणि AOA (Articles of Association) कागदपत्रे तयार करण्याची महत्त्वाची जबाबदारी सल्लागारांकडे देण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संस्थेच्या कार्यकक्षेचे स्वरूप, उद्दिष्टे आणि प्रशासनिक रचना अंतिम होणार आहे.
अल्पसंख्याक विकासासाठी नवीन पर्वाची सुरुवात
अल्पसंख्याक समाजाच्या विविध समस्या, त्यांच्या शैक्षणिक-सामाजिक स्थितीचा अभ्यास, तसेच शासनाला धोरणात्मक उपाययोजना सुचवणे — यासाठी दि. 22 ऑगस्ट 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार मार्टि संस्थेची स्थापना करण्यात आली होती.
बार्टी, सारथी आणि महाज्योतीच्या धर्तीवर उभारण्यात येणारी ही संस्था अल्पसंख्याक समाजासाठी अभ्यास, संशोधन आणि प्रशिक्षणाचे प्रमुख केंद्र ठरणार आहे. मार्टि सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना, संशोधकांना आणि मार्गदर्शनाची गरज असलेल्या युवकांना थेट लाभ मिळणार आहे.
उद्घाटनासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संस्थेचे उद्घाटन होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.