"महापालिकेच्या रणांगणात नव्या पिढीची गर्जना!प्रभाग ३ मधून ३६ वर्षीय उच्चशिक्षित युवक अलीम सौदागर मैदानात; सर्व पक्षांचे लक्ष वेधले"

"महापालिकेच्या रणांगणात नव्या पिढीची गर्जना!प्रभाग ३ मधून ३६ वर्षीय उच्चशिक्षित युवक अलीम सौदागर मैदानात; सर्व पक्षांचे लक्ष वेधले"

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १३ :- महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. अजून अधिकृत निवडणूक घोषणा व्हायच्या आधीच इच्छुक उमेदवारांनी कंबर कसली असून, “तिकीट मिळो अथवा न मिळो” या भूमिकेतून तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे, यावेळी राजकारणात नव्या दमाच्या युवकांची मोठ्या प्रमाणात एन्ट्री होताना दिसत आहे.

याच पार्श्वभूमीवर दिल्लीगेट परिसरातील रहिवासी, ३६ वर्षीय पदवीधर युवक सय्यद अलीम सय्यद करीम सौदागर यांनी प्रभाग क्रमांक ३ मधून महापालिका निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांनी थेट जनतेत जाऊन संपर्क वाढवण्यास सुरुवात केली असून, दररोज महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणे आणि वस्त्यांमध्ये भेटी देत युवकांचे प्रश्न, अपेक्षा व समस्या जाणून घेत आहेत.

यंदाच्या महापालिका निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष युवकांना जास्तीत जास्त संधी देण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे. अलीम सौदागर हे उच्चशिक्षित आणि अभ्यासू तरुण असल्याने त्यांनी प्रभागातील पायाभूत सुविधा, नागरी समस्या, शिक्षण, रोजगार, महिला-सशक्तीकरण आणि ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांचा सखोल अभ्यास आतापासूनच सुरू केला आहे.

ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक-युवती आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विकासाभिमुख दृष्टीकोनातून त्यांनी संवाद सुरू केल्याने त्यांच्या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

प्रभाग क्रमांक ३ मध्ये एकूण ४६,००३ मतदार असून, त्यापैकी १३,४६७ अनुसूचित जाती (SC) आणि ८१८ अनुसूचित जमाती (ST) मतदार आहेत. याशिवाय अल्पसंख्याक मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय असल्याने या सामाजिक समिकरणाचा लाभ आपल्याला होईल, असा विश्वास अलीम सौदागर यांनी व्यक्त केला आहे.

या प्रभागात पहाडसिंगपुरा, बेगमपुरा, विद्युत कॉलनी, हनुमान टेकडी, साफल्य नगर, पेठे नगर, भावसिंगपुरा पार्ट, भीम नगर पार्ट, कानिफनाथ कॉलनी, जयसिंगपुरा, कुतुबपुरा आणि पराक्रम कॉलनी या परिसरांचा समावेश होतो. विविध समाजघटक, युवकांचा मोठा वर्ग आणि मिश्र मतदारसंख्या असलेल्या या प्रभागात विकासाभिमुख, तरुण चेहऱ्याला संधी मिळणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

 तरुणाईच्या ताकदीवर प्रभाग ३ मध्ये नवे राजकीय समीकरण घडणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.