मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा ८ व ९ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर दौरा; संघटन बळकटीकरणावर भर
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. ७ :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर यांचा ८ आणि ९ ऑगस्ट २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा दोन दिवसीय दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्यात विविध बैठका, मेळावे आणि संघटनात्मक कार्यक्रमांच्या माध्यमातून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे.
दौऱ्यादरम्यान नांदगावकर हे पक्षाचे पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक, महिला सेना आणि विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन आगामी राजकीय आणि संघटनात्मक रणनीतीवर चर्चा करण्यात येणार आहे.
शनिवार, ८ ऑगस्ट रोजी सकाळी ६.१५ वाजता नांदगावकर यांचे छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता पैठण येथील संत एकनाथ महाराज समाधी मंदिराला भेट देऊन दर्शन घेतील. सकाळी ११.३० वाजता विजय स्तंभ (तीर्थखांब) येथे भेट देण्यात येणार असून दुपारी १२ वाजता पैठण विधानसभा पदाधिकारी निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. दुपारी २.३० वाजता प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असून सायंकाळी ५.३० वाजता मनसे महिला सेनेची बैठक पार पडणार आहे.
रविवार, ९ ऑगस्ट रोजी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक तसेच मनसे विद्यार्थी सेनेची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकींमध्ये पक्ष संघटन मजबूत करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
राज्य उपाध्यक्ष दिलीप चितलांगे, सतनामसिंग गुलाटी आणि जिल्हा संपर्क अध्यक्ष बिपीन नाईक यांनी सर्व पदाधिकारी, अंगीकृत सेना पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिकांनी नियोजित कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
ही माहिती मनसेचे शहर सचिव राहुल पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.