“भाड्याने घेतली कार, गहाण ठेवून फसवणूक” – वेदांतनगर पोलिसांची झटपट कारवाई; तीन आरोपी अटकेत!

“भाड्याने घेतली कार, गहाण ठेवून फसवणूक” – वेदांतनगर पोलिसांची झटपट कारवाई; तीन आरोपी अटकेत!
“भाड्याने घेतली कार, गहाण ठेवून फसवणूक” – वेदांतनगर पोलिसांची झटपट कारवाई; तीन आरोपी अटकेत!

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि१६ :- कार भाड्याने घेऊन ती परस्पर गहाण ठेवून लाखोंची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून वेदांतनगर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे.

या प्रकरणी गु.र.नं. 59/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 316(2), 318(4), 3(5), 352, 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी तुफैल शेख मुस्ताक शेख (वय 29, व्यवसाय – इलेक्ट्रीशियन, रा. सिल्कमिल कॉलनी, छत्रपती संभाजीनगर) यांनी तक्रार दिली आहे.

तक्रारीनुसार, आरोपी स्वप्नील कोळी, संदीप जाधव, नदिम शेख यांनी संगनमताने 10 जानेवारी 2026 रोजी फिर्यादीची मारुती सुझुकी कंपनीची एर्टिगा (MH-04 GM-7677) ही कार भाडेतत्त्वावर घेऊन विश्वास संपादन केला. त्यानंतर ही कार युसूफ शहा याच्याकडे गहाण ठेवून विश्वासघात केला. युसूफ शहा यानेही कोणतीही शहानिशा न करता स्वतःच्या फायद्यासाठी गाडी ताब्यात ठेवली.

पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत सदरची एर्टिगा कार जप्त केली असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. एका आरोपीला मालेगाव येथून तर दोन आरोपींना ग्रामीण भागातून ताब्यात घेण्यात आले आहे. न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी (PCR) सुनावली आहे.

तपासात धक्कादायक बाब समोर आली असून ही टोळी अशाच पद्धतीने गाड्या भाड्याने किंवा EMI भरण्याच्या बहाण्याने घेऊन कमी किमतीत विक्रीसाठी गुजरात, मध्य प्रदेशसारख्या राज्यात पाठवत असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणात आणखी वाहनांचा शोध लागण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

या कारवाईत पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव, पीएसआय वैभव मोरे, हेड कॉन्स्टेबल डहाके, पोलीस नाईक मनोज चव्हाण, कॉन्स्टेबल रज्जू सिंग सुलाने व होडशील यांनी मोलाची भूमिका बजावली.

दरम्यान, संभाजीनगर शहर व ग्रामीण भागातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्येही अशाच प्रकारचे गुन्हे दाखल झाले असून वेदांतनगर पोलिसांनी जलद कारवाई करत टोळीचा पर्दाफाश केला आहे.

👉 “गाडी भाड्याने देताना सतर्क राहा… अन्यथा क्षणात होऊ शकते लाखोंची फसवणूक!”