भाजपवर निशाणा? संजय गायकवाड म्हणाले, “भोळे राहिलात तर मित्रपक्ष गडप करू शकतो!”

भाजपवर निशाणा? संजय गायकवाड म्हणाले, “भोळे राहिलात तर मित्रपक्ष गडप करू शकतो!”
भाजपवर निशाणा? संजय गायकवाड म्हणाले, “भोळे राहिलात तर मित्रपक्ष गडप करू शकतो!”

महाराष्ट्र वाणी

बुलढाणा दि १६ :- शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्या “मी भोळा नाही; भोळा असतो तर भाजपवाल्यांनी मला खाऊन टाकलं असतं!” या मिश्किल वक्तव्यानंतर महायुतीतील अंतर्गत राजकारण पुन्हा चर्चेत आले आहे. त्यातच आता शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनीही मित्रपक्ष भाजपला अप्रत्यक्ष इशारा देणारे वक्तव्य केले आहे.

“शिवसेनेच्या लोकांनी भोळे राहून फायदा नाही. जो भोळा राहील, त्याला मित्रपक्ष गडप करू शकतो,” असे संजय गायकवाड यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे शिवसेना आणि भाजपमधील राजकीय समीकरणांबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याचा रोख भाजपकडे असल्याची राजकीय चर्चा सुरू असतानाच गायकवाड यांच्या वक्तव्याने त्यात आणखी भर पडली आहे. मित्रपक्षांसोबत राजकारण करताना सावध राहण्याचा संदेशच त्यांच्या वक्तव्यातून देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

महायुतीमध्ये शिवसेना आणि भाजप हे सत्तेतील प्रमुख घटक पक्ष आहेत. मात्र, स्थानिक तसेच संघटनात्मक पातळीवरील राजकीय स्पर्धा आणि नेत्यांची वक्तव्ये यामुळे दोन्ही पक्षांमधील संबंध वेळोवेळी चर्चेत येत असतात.

संजय गायकवाड यांच्या या विधानाचा नेमका राजकीय अर्थ काय, याबाबत आता विविध तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.

तुम्हाला संजय गायकवाड आणि गुलाबराव पाटील यांच्या या वक्तव्यांबाबत काय वाटते? कमेंटमध्ये तुमचे मत नक्की कळवा.