बेकायदेशीर लोन अॅप्सवर सरकारचा कडक बडगा — तब्बल ८७ अॅप्स ब्लॉक!
महाराष्ट्र वाणी
देशात वाढत चाललेल्या डिजिटल फसवणुकीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने मोठी कारवाई केली आहे. अनियमितरीत्या कर्ज देण्याचा दावा करून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या ८७ बेकायदेशीर लोन अॅप्सना बंदी घालण्यात आली आहे.
माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० च्या कलम ६९ अ अंतर्गत केंद्र सरकारला जनतेच्या सुरक्षेसाठी अशा अॅप्सवर कारवाई करण्याचा अधिकार आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्रालयाने हे अॅप्स ब्लॉक केल्याची माहिती समोर आली आहे.
लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांनी सांगितले की, संशयास्पद आर्थिक व्यवहार आणि बेकायदेशीरपणे ऑनलाइन कर्जपुरवठा करणाऱ्या कंपन्यांवर सातत्याने तपासणी सुरू आहे. कंपनी कायदा, २०१३ नुसार अशा कंपन्यांची बँक खात्यांची तपासणी, आर्थिक ऑडिट आणि संबंधित सर्व प्रकारच्या चौकशा करण्यात येत आहेत.
त्यांनी स्पष्ट केले की, कायद्याचे उल्लंघन झाल्याचे आढळताच कोणतीही ढिलाई न दाखवता सरकार तातडीने कारवाई करते. या मालिकेत बेकायदेशीर कर्जपुरवठा करणाऱ्या ८७ अॅप्सवर ब्लॉकची कारवाई करण्यात आली आहे.