बसस्थानक परिसरातील अवैध प्रवासी वाहतुकीवर एसटीचा धडक प्रहार; २०० मीटर परिसरात विशेष मोहीम
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. ८ :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बसस्थानक परिसरातील अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी विशेष कारवाई मोहीम सुरू केली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार तसेच मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी डॉ. प्रियंका नारनवरे यांच्या आदेशानुसार ही मोहीम ५ जून ते १५ जून २०२६ या कालावधीत राबविली जात आहे.
या मोहिमेअंतर्गत बसस्थानकाच्या २०० मीटर परिसरातील ‘नो पार्किंग’ क्षेत्रात अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई केली जात आहे. विशेषतः सिडको आणि मध्यवर्ती बसस्थानक परिसरात संयुक्त पथकांमार्फत तपासणी मोहीम सुरू असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
वरिष्ठ सुरक्षा व दक्षता अधिकारी विक्रमसिंह भोसले आणि सुरक्षा व दक्षता अधिकारी दीपक शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. आगार व्यवस्थापन, सुरक्षा विभाग आणि वाहतूक अधिकाऱ्यांच्या समन्वयातून पोलिसांच्या सहकार्याने कारवाईला वेग देण्यात आला आहे.
या उपक्रमामुळे बसस्थानक परिसरातील वाहतूक व्यवस्थेत शिस्त निर्माण होण्यास मदत होत असून प्रवाशांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य दिले जात आहे. अवैध प्रवासी वाहतुकीचा वापर टाळून नागरिकांनी अधिकृत एसटी सेवेलाच प्राधान्य द्यावे, तसेच नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.
वाचकांसाठी महत्त्वाचे : सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवासासाठी अधिकृत एसटी सेवांचा वापर करा; अवैध वाहतुकीला नकार देणे हीच जबाबदार नागरिकांची भूमिका आहे.