परळी नगरपरिषद उपनगराध्यक्ष पद! लिंगायत समाजाला न्याय द्या; योगेश मेनकुदळे यांनाच संधी द्यावी – शिवकुमार केदारी

परळी नगरपरिषद उपनगराध्यक्ष पद! लिंगायत समाजाला न्याय द्या; योगेश मेनकुदळे यांनाच संधी द्यावी – शिवकुमार केदारी

महाराष्ट्र वाणी 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) दि २४ :- परळी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदावर लिंगायत समाजाला थेट व ठोस न्याय देत समाजातील अनुभवी, संघटनात्मक आणि सर्वसमावेशक नेतृत्व असलेले योगेश विजयकुमार मेनकुदळे यांचीच नियुक्ती करावी, अशी ठाम व स्पष्ट मागणी वीरशैव विकास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष शिवकुमार केदारी यांनी केली आहे.

परळी शहरात लिंगायत समाजाची लोकसंख्या सुमारे २० ते २५ हजार मतदारांची आहे. गेल्या अनेक दशकांपासून हा समाज कोणतीही अट न ठेवता, कोणताही लाभ न पाहता मुंडे घराण्याच्या पाठीशी निष्ठेने उभा राहिला आहे. नगरपरिषद, विधानसभा, लोकसभा तसेच विविध संस्थात्मक निवडणुकांमध्ये लिंगायत समाजाने नेहमीच निर्णायक भूमिका बजावली आहे.

असे असताना नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीत लिंगायत समाजाला केवळ तीन उमेदवारांची संधी देण्यात आली होती. त्यापैकी दोन उमेदवार विजयी झाले, हे समाजाच्या ताकदीचे स्पष्ट द्योतक आहे. त्यामुळे उपनगराध्यक्ष पदावर समाजाला प्रतिनिधित्व न देणे हे अन्यायकारक ठरेल, असे केदारी यांनी स्पष्ट केले.

योगेश मेनकुदळे हे परळीच्या राजकारणात खोल मुळे असलेले नेतृत्व आहे. त्यांचे आजोबा स्व. गुरुलिंग आप्पा मेनकुदळे यांनी तब्बल १३ वर्षे नगराध्यक्ष म्हणून भरीव विकासकामे केली. तसेच वडील विजयकुमार गुरुलिंग आप्पा मेनकुदळे यांनी १० वर्षे नगरसेवक व सभापती म्हणून प्रभावी भूमिका बजावली आहे.

योगेश मेनकुदळे यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे परळी शहर अध्यक्षपद १५ वर्षे भूषवले. युवक संघटन, जनआंदोलन, सामाजिक उपक्रम आणि पक्षवाढीसाठी त्यांनी सातत्याने योगदान दिले आहे. ते सर्व समाज घटकांशी समन्वय साधणारे, सामाजिकदृष्ट्या सक्रिय आणि विश्वासार्ह नेतृत्व मानले जातात.

वीरशैव-लिंगायत वधू-वर परिचय मेळावे, सामूहिक विवाह सोहळे, समाजोपयोगी उपक्रम आणि विविध सामाजिक प्रश्नांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. त्यामुळे ते केवळ लिंगायत समाजाचे नव्हे, तर संपूर्ण परळी शहराचे प्रतिनिधित्व करू शकतात, असे केदारी यांनी नमूद केले.

लिंगायत समाजाचा मुंडे घराण्याशी असलेला विश्वास स्व. गोपीनाथ मुंडे साहेबांच्या काळापासून अखंड आहे. मात्र सातत्याने दुर्लक्ष झाले, तर समाजात अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

तरी मा. पंकजाताई गोपीनाथराव मुंडे व मा. धनंजय मुंडे साहेबांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, लिंगायत समाजाच्या भावना व योगदानाचा सन्मान राखत, परळी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदावर योगेश विजयकुमार मेनकुदळे यांचीच निवड करावी, अशी ठाम मागणी शिवकुमार केदारी यांनी केली आहे.

न्याय मिळालाच पाहिजे, कारण लिंगायत समाजाने नेहमीच निष्ठा निभावली आहे!