परदेशी शिष्यवृत्ती योजना अल्पसंख्याक आयुक्तालयाकडे द्या – मार्टि कृती समितीची मागणी
🔁 अर्जासाठी १५ दिवसांची वाढीव मुदत द्यावी, सविस्तर निवेदन सादर

महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ५ ऑगस्ट :– अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी लागू असलेली परदेशी पदव्युत्तर व पीएच.डी. अभ्यासक्रम शिष्यवृत्ती योजना समाजकल्याण आयुक्त कार्यालयाऐवजी थेट अल्पसंख्याक आयुक्तालयामार्फत राबवावी, अशी ठाम मागणी मार्टि कृती समिती महाराष्ट्रकडून करण्यात आली आहे.
या मागणीसाठी अँड. अझर पठाण (अध्यक्ष, मार्टि कृती समिती महाराष्ट्र) आणि सरताज शाकेर (अभ्यास समिती सदस्य) यांनी अल्पसंख्याक आयुक्त मा. प्रतिभा इंगळे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांपर्यंत शिष्यवृत्ती योजनेची माहिती प्रभावीपणे पोहोचविणे, अर्ज प्रक्रिया सुलभ करणे व पारदर्शकता वाढवणे या उद्देशाने अल्पसंख्याक आयुक्तालयामार्फतच योजना राबवणे फायदेशीर ठरेल, असे समितीचे मत आहे.
दरम्यान, सदर शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 ऑगस्ट 2025 होती. मात्र अनेक पात्र विद्यार्थ्यांना माहिती उशिरा मिळाल्याने किंवा कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने अर्ज करता आले नाहीत. त्यामुळे अर्ज करण्यासाठी किमान १५ दिवसांची वाढीव मुदत द्यावी, अशीही विनंती यावेळी करण्यात आली.
शिष्यवृत्ती योजनेचा लाभ अधिकाधिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी शासनाने सहानुभूतीपूर्वक आणि तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
अधिक अपडेटसाठी वाचा – महाराष्ट्र वाणी!