पदवीधरांच्या प्रश्नांसाठी मैदानात उतरा, अहोरात्र काम करा! शरद पवारांचे नवनिर्वाचित आमदार प्रतापसिंह पाटलांना मार्गदर्शन

पदवीधरांचे न्याय्य हक्क मिळवून देण्याचा निर्धार; शिक्षण, रोजगार आणि स्पर्धा परीक्षांचे प्रश्न सभागृहात मांडणार

पदवीधरांच्या प्रश्नांसाठी मैदानात उतरा, अहोरात्र काम करा! शरद पवारांचे नवनिर्वाचित आमदार प्रतापसिंह पाटलांना मार्गदर्शन
पदवीधरांच्या प्रश्नांसाठी मैदानात उतरा, अहोरात्र काम करा! शरद पवारांचे नवनिर्वाचित आमदार प्रतापसिंह पाटलांना मार्गदर्शन

मुंबई दि ३० :- मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून ऐतिहासिक विजय मिळवणारे नवनिर्वाचित आमदार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी मुंबईतील सिल्वर ओक येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते खा. शरदचंद्र पवार यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी पवार यांचे आशीर्वाद घेतले. या प्रसंगी पक्षाचे प्रवक्ते मेहबूब शेख आणि माजी खासदार वंदना चव्हाण उपस्थित होते.

या भेटीत शरद पवार यांनी डॉ. प्रतापसिंह पाटील यांना पदवीधरांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा सल्ला दिला. पदवीधर बांधवांच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने आणि अहोरात्र काम करा, असे मार्गदर्शन त्यांनी केले. मिळालेल्या संधीचे रूपांतर पदवीधरांच्या प्रश्नांच्या प्रभावी सोडवणुकीत झाले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, शरद पवार यांच्या मार्गदर्शनानंतर आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी मराठवाड्यातील पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त केला. शिक्षण, बेरोजगारी, रोजगाराच्या संधी, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी तसेच युवकांच्या विविध प्रश्नांवर प्रामाणिकपणे काम करून त्यांचा आवाज विधिमंडळात बुलंद करणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

शरद पवार यांचे पुरोगामी विचार, सर्वसमावेशक विकासाची भूमिका आणि लोकसेवेचा वारसा पुढे नेण्याचा आपला प्रयत्न राहील, असेही डॉ. पाटील यांनी सांगितले. साहेबांचे मार्गदर्शन, आशीर्वाद आणि विश्वास हीच आपली ऊर्जा असून पदवीधर बांधवांची सेवा करणे हेच आपले प्रमुख ध्येय असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

निवडणुकीतील विजयापाठोपाठ आता पदवीधरांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे संकेत या भेटीतून मिळाले आहेत.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित