पत्नीची छेड काढल्याच्या संशयातून मित्राचा खून; ४८ तासांत आरोपी जेरबंद! ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २९ :- पत्नीची छेड काढत असल्याच्या रागातून मित्राचाच निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या ४८ तासांत अटक केली आहे.
दिनांक २५ मे २०२६ रोजी कच्ची घाटी परिसरात २५ ते २७ वर्षे वयोगटातील एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामीण पोलीस अधीक्षक प्रकाश भा. जाधव आणि अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना दिल्या.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपुत यांनी पथकासह घटनास्थळाची पाहणी करत तपासाची सूत्रे वेगाने हलवली. सुरुवातीला मृताची ओळख पटवणे आव्हानात्मक होते. मात्र, गुप्त बातमीदार, सीसीटीव्ही फुटेज आणि विविध जिल्ह्यांतील मिसिंग नोंदींची पडताळणी करत पोलिसांनी तपास सुरू ठेवला.
व्हॉट्सअॅपद्वारे मृताचे फोटो प्रसारित केल्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार मृताची ओळख शेख आवेश शेख परवेज (वय २५) अशी पटली. तो मूळचा जालना येथील असून सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत होता.
तपासादरम्यान मृताच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, आवेश हा २५ मे रोजी त्याचा मित्र शेख फैयाज शेख महेमूद याच्यासोबत स्कुटीवर गेला होता. यानंतर पोलिसांनी संशयित शेख फैयाज (वय २६, रा. रेहमानिया कॉलनी, किरडपुरा) याचा शोध घेत २७ मे रोजी त्याला ताब्यात घेतले.
पोलिसी चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. “मृत आवेश माझ्या पत्नीची सतत छेड काढत होता. मी त्याला अनेकदा समजावले होते. मात्र तो ऐकत नव्हता. त्यामुळे मला त्याचा राग आला होता,” असे आरोपीने सांगितले.
घटनेच्या दिवशी दोघेही दारू पित असताना पुन्हा वाद झाला. रागाच्या भरात आरोपीने दगडाने डोक्यात वार करून आवेशचा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर तो घटनास्थळावरून पसार झाला होता.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री. प्रकाश भा. जाधव, मा.अपर पोलीस अधिक्षक श्री, प्रशांत स्वामी, यांचे मार्गदर्शनाखाली पुजा नागरे, उपविभागीय पो. अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विजयसिंह राजपुत, पो.उपनि. महेश घुगे, पोह/ कासीम शेख, सचिन राठोड, सुनिल गोरे, बलविर बहुरे, शिवाजी मगर, निलेश कुडे, पो.स्टे. चिकलठाणा येथील पोलीस निरीक्षक राजेद्रं बनसोडे, पो. उपनि. श्रिनिवास धुळे व अमंलदार यांनी केली आहे.
या प्रकरणात चिकलठाणा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १०३(३), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
“अवघ्या ४८ तासांत खुनाचा उलगडा करत ग्रामीण पोलिसांनी पुन्हा एकदा तपास कौशल्य सिद्ध केले आहे.”