“निष्ठेला किंमत नाही, पैशालाच तिकीट!” – कार्यकर्त्यांच्या वेदनेवर घाला घालणारे तिकीटांचे राजकारण

“निष्ठेला किंमत नाही, पैशालाच तिकीट!” – कार्यकर्त्यांच्या वेदनेवर घाला घालणारे तिकीटांचे राजकारण

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद)दि. ३१.  :-   आजच्या राजकारणात तिकीट मिळवण्यासाठी निष्ठा, प्रामाणिकपणा किंवा वर्षानुवर्षांचे पक्षकार्य पुरेसे राहिलेले नाही. “पैसा असेल तरच तिकीट, पैसा नसेल तर फक्त झेंडा उचलून निवडून येता येत नाही” ही कडवी वस्तुस्थिती सर्वच पक्षांना मान्य असल्याने अनेक जुने, कष्टाळू कार्यकर्ते तिकीटापासून वंचित राहत आहेत.

३० वर्षे पक्षासाठी राबूनही तिकीट न मिळाल्याची उदाहरणे आज सामान्य झाली आहेत. मग प्रश्न उपस्थित होतो—मागील तीन दशकांत न मिळालेले तिकीट आज कसे मिळणार? उलट काही जण चार दिवसांत उद्योग-व्यवसायातून पैसा कमावून पक्षात प्रवेश करतात आणि थेट तिकीटही मिळवतात, हे चित्र सर्वांनाच परिचित आहे.

एका जागेसाठी २५ ते ३० इच्छुक कार्यकर्ते रांगेत असतात. अशा परिस्थितीत तिकीट एका व्यक्तीलाच मिळणार आणि उर्वरित नाराज होणार, हे अपरिहार्य आहे. पुढील विधानसभा व लोकसभा निवडणुकांचा विचार करत “ताकदवान उमेदवार पुढे यावा” या भूमिकेतूनच पक्ष तिकीट वाटप करतात. जास्तीत जास्त कार्यकर्त्यांचे समाधान साधण्यासाठी काही वेळा युती टाळली जाते, हेही वास्तव आहे.

मात्र अनेकदा स्थानिक गटबाजी, वैयक्तिक अहंकार, पदांच्या स्पर्धा आणि मतभेद यांचा फटका प्रामाणिक कार्यकर्त्यांना बसतो. “आपण डोईजड ठरू” या भीतीतूनही तिकीट कापले जाते. त्यामुळे वार्डात स्वतंत्र ओळख निर्माण करणे, सर्वेक्षणात लोकांच्या तोंडी आपले नाव येईल इतके काम करणे, स्थानिक नेत्यांशी जुळवून घेण्याची कला आत्मसात करणे, हे आजच्या राजकारणातील नवे धडे बनले आहेत.

निवडणूक लढवायची असेल तर पैसा ही पहिली अट ठरली आहे. बूथ मॅनेजमेंटपासून प्रचारापर्यंत सर्वत्र खर्च अनिवार्य आहे. काही वेळा शहराचा अभ्यास, जातींची लोकसंख्या, वार्डाची वस्तुस्थिती याचा अभाव असल्यानेही तिकीट वाटपात गोंधळ होतो. तर काही ठिकाणी स्थानिक नेते तिकीटासाठी पैसे घेऊन आपली ‘दुकानदारी’ चालवतात—आणि पुन्हा एकदा पैसा हाच निर्णायक ठरतो.

राजकारण ही तारेवरची कसरत आहे. सर्वांना समाधानी ठेवणे शक्य नसते. मात्र व्यक्तिगत द्वेष, अहंकार आणि सूडभावना असलेला नेता आपल्या दराऱ्यासाठी निवडून येऊ शकणाऱ्या चांगल्या कार्यकर्त्यांचे तिकीट कापतो. प्रसंगी इतर पक्षांतून आयात करून, पैसे नसलेल्यांनाच संधी देतो. सत्ता असताना अशा नाराजीला फारसे महत्त्व दिले जात नाही; उलट नाराज गटांचा वापर भविष्यातील गटबाजीसाठी केला जातो.

एकंदरीत पाहता, आजच्या राजकारणात गरीब, प्रामाणिक, कष्टाळू आणि निष्ठावंत असणे पुरेसे राहिलेले नाही. चापलूसी करणारे, नेत्यांच्या मागे-पुढे फिरणारे ‘गेस्ट हाऊस’ किंवा ‘विमानतळ’ कार्यकर्ते अनेकदा बाजी मारतात. आणि हे सर्व कळत असूनही जनता अशाच लोकांना निवडून देते.

निवडणूक म्हणजे समाजसेवा नव्हे, तर पैसा कमावण्याचा राजमार्ग बनत चालल्याचे हे वास्तव आहे. या तळमळीला ‘समाजसेवा’ असे गोंडस नाव देऊन लोकशाहीच्या नावाखाली टाळ्या वाजवल्या जात आहेत—आणि यात बळी ठरतो तो फक्त निष्ठावंत कार्यकर्ता.

– रघुनाथदादा शंकरराव पाटील

👉 वाचकांनो, तुम्हाला काय वाटते—राजकारणात निष्ठेला पुन्हा किंमत मिळणार की पैसाच सर्वस्व राहणार?