नशेच्या गोळ्यांचा काळाबाजार उघड! छत्रपती संभाजीनगरमध्ये ११० नायट्रोसन गोळ्या जप्त; तिघांविरुद्ध NDPS अंतर्गत गुन्हा
१ लाख ७५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; अंमली पदार्थ प्रतिबंधक पथकाची मोठी कारवाई, शताब्दीनगरमधील तिघे पोलिसांच्या रडारवर!
छत्रपती संभाजीनगर दि. १४ :- शहरात नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधी गोळ्यांच्या अवैध विक्रीविरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक पथकाने मोठी कारवाई केली आहे. पंचायत समितीच्या मोकळ्या मैदान परिसरात छापा टाकून पोलिसांनी नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या Nitrosun-10 या औषधाच्या तब्बल ११० गोळ्या जप्त केल्या आहेत. या कारवाईत एकूण १ लाख ७५ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी तिघांविरुद्ध NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुप्त माहितीवरून पोलिसांची धडक कारवाई
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे १३ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पंचायत समिती मोकळे मैदान परिसरात कारवाई केली.
यावेळी शाहेबाज रईस शेख (वय २४) आणि शुभम रमेश डेरे (वय २८, दोघेही रा. शताब्दीनगर, छत्रपती संभाजीनगर) हे दोघे नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या Nitrosun-10 औषधाच्या ११० गोळ्या अवैधरीत्या विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगताना आढळून आले.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात या गोळ्या आवेस फारुख बागवान (रा. शताब्दीनगर) याच्याकडून शाहेबाज शेख याने खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या तिघांविरुद्ध सिटी चौक पोलीस ठाण्यात NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) शशिकांत सातव, प्रभारी पोलीस उपआयुक्त (गुन्हे) शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) पूनम पाटील आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
या पथकात सहायक पोलीस निरीक्षक सचिन जाधव, पोलीस उपनिरीक्षक उत्रेश्वर मुंडे, पोलीस अंमलदार सतीष जाधव, देशराज मोरे, विशाल मेटे, नितेश सुंदडे, सरताज पठाण तसेच चालक होमगार्ड पठाण यांचा सहभाग होता.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
शहरात कुठेही अंमली पदार्थांची विक्री, सेवन किंवा नशेखोरी करणाऱ्या टोळ्या आढळल्यास तसेच अशा प्रकारांसाठी कोणी जागा उपलब्ध करून देत असल्यास नागरिकांनी पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाने केले आहे.
गोपनीय माहिती देण्यासाठी
व्हॉट्सॲप क्रमांक : 9684702002
नशेच्या विळख्यात तरुणाई अडकू नये, यासाठी नागरिकांनीही सतर्क राहून पोलिसांना सहकार्य करण्याची गरज आहे.
महाराष्ट्र वाणी |
सत्यासाठी निर्भीड | जनतेसाठी समर्पित