दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आता रिक्षाचा आधार! पाच वर्षांत १ लाख ऑटो रिक्षांचे वाटप; ९ फेब्रुवारीपासून योजनेची सुरुवात - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
शेतीवरील आर्थिक अवलंबित्व कमी करण्यासाठी राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी निर्णय; पात्र शेतकऱ्यांना स्वयंरोजगाराची संधी
मुंबई दि २६ :- सततची दुष्काळी परिस्थिती, निसर्गाची अनियमितता, शेतीमालाला मिळणारा अपेक्षित बाजारभाव नसणे आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शेतकऱ्यांना शेतीसोबत उत्पन्नाचे पर्यायी साधन उपलब्ध करून देण्यासाठी पुढील पाच वर्षांत तब्बल १ लाख प्रवासी ऑटो रिक्षांचे वाटप करण्याची महत्त्वाकांक्षी योजना जाहीर करण्यात आली आहे.
'अनाथांचा नाथ... दुष्काळग्रस्त शेतकरी रिक्षा सन्मान योजना' असे या योजनेचे नाव असून, २०२७ ते २०३१ या कालावधीत ही योजना राबविण्यात येणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या योजनेची घोषणा केली.
विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येत्या ९ फेब्रुवारी २०२७ रोजी योजनेतील पात्र शेतकऱ्यांना ऑटो रिक्षांच्या चाव्या सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या सहकार्याने परिवहन विभाग आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येणार आहे.
या योजनेचा लाभ प्रामुख्याने दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील अल्पभूधारक आणि अत्यल्प भूधारक शेतकरी कुटुंबांना देण्यात येणार आहे. शेतीतून मिळणाऱ्या अनिश्चित उत्पन्नावरील अवलंबित्व कमी करून प्रवासी वाहतुकीच्या माध्यमातून नियमित उत्पन्न मिळविण्याची संधी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे, हा या योजनेमागील मुख्य उद्देश आहे.
शेतीला जोडधंदा म्हणून स्वयंरोजगाराची संधी
सततच्या नैसर्गिक संकटांमुळे शेती करणे दिवसेंदिवस खर्चिक आणि अनिश्चित बनत आहे. अशा परिस्थितीत शेतकरी कुटुंबांना पर्यायी रोजगार मिळाल्यास त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे एक लाख रिक्षा वाटपाची ही योजना प्रत्यक्षात कितपत प्रभावी ठरते आणि पात्र लाभार्थ्यांना त्याचा किती फायदा मिळतो, याकडे आता राज्यातील शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित