"दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र!" – सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या निवडीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र विधानमंडळाच्यावतीने आयोजित सत्कार सोहळ्यात दानवे बोलत होते.

"दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र!" – सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या निवडीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र वाणी न्युज 

मुंबई, ८ जुलै :– "दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा!" अशा शब्दांत राज्य विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्त झालेले न्यायमूर्ती भूषण गवई यांचे गौरवगान केले. महाराष्ट्र विधानमंडळाच्यावतीने आयोजित सत्कार सोहळ्यात दानवे बोलत होते.

दानवे म्हणाले, "महाराष्ट्र आणि मराठी भाषेवर वेळोवेळी प्रश्न उपस्थित केले जातात. मात्र महाराष्ट्र कृतीतून उत्तर देतो. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या रूपाने पुन्हा एकदा महाराष्ट्राने देशाच्या सर्वोच्च स्थानावर आपली छाप सोडली आहे."

गवई यांचा जन्म व शिक्षण विदर्भात झाले असून, संभाजीनगर खंडपीठाचे प्रमुख म्हणून त्यांनी दीर्घ सेवा बजावली. दानवे यांनी विशेष उल्लेख केला की, "विदर्भ आणि मराठवाडा ही एकच माती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या मिलिंद महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी अनेक विदर्भातील विद्यार्थी येतात. त्या भूमीतून सरन्यायाधीश होणे ही महाराष्ट्रासाठी गौरवाची गोष्ट आहे."

दानवे पुढे म्हणाले, "भूषण गवई यांची सर्वोच्च पदावर नेमणूक ही महाराष्ट्रासाठी भूषणावह बाब आहे. त्यांची सामाजिक न्यायाची जाण, संविधानाप्रती निष्ठा आणि न्यायालयाच्या विश्वासार्हतेविषयीची बांधिलकी नक्कीच सर्वोच्च न्यायालयाची पत उंचावेल."

शेवटी, मराठी भाषेबाबत बोलताना दानवे म्हणाले, "प्राथमिक शिक्षण मराठीमधून घेतले तरीही एखादी व्यक्ती देशाच्या सर्वोच्च न्यायासनावर पोहोचू शकते, हे भूषण गवई यांनी सिद्ध केले आहे."

✍️ महाराष्ट्रासाठी हीच अभिमानाची वेळ – बातम्या वाचा, महाराष्ट्र वाणी.com वर!