थकबाकीदारांना मनपाचा दणका! २० मालमत्ता सील; एका दिवसात ४३.७० लाखांचा मालमत्ता कर वसूल

थकबाकीदारांना मनपाचा दणका! २० मालमत्ता सील; एका दिवसात ४३.७० लाखांचा मालमत्ता कर वसूल

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १ : महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने मोठ्या थकबाकीदारांविरोधात गुरुवारी (दि. १ ऑक्टोबर) धडक कारवाई केली. मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे आणि उपआयुक्त (कर निर्धारक व संकलक) विकास नवाळे यांच्या सूचनेनुसार शहरातील सर्व झोन कार्यालयांच्या पथकांनी मोठ्या थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त व सील करण्याची कारवाई केली. या कारवाईत दिवसभरात तब्बल ४३.७० लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्यात आला.

कारवाईदरम्यान विविध झोनमध्ये २० मालमत्ता सील करण्यात आल्या. तसेच जप्तीची कारवाई सुरू असताना अनेक मालमत्ताधारकांनी थकीत कराचा भरणा केला.

झोननिहाय कारवाई व वसुली

झोन १ : २ मालमत्ता सील; १ मालमत्ताधारकाकडून २.०५ लाख रुपये वसूल.

झोन २ : ६ मालमत्ताधारकांकडून ४.५१ लाख रुपये वसूल.

झोन ३ : १ मालमत्ताधारकाकडून ५० हजार रुपये वसूल.

झोन ४ : २ मालमत्ता सील; १ मालमत्ताधारकाकडून १.०४ लाख रुपये वसूल.

झोन ५ : १ मालमत्ता सील; २ मालमत्ताधारकांकडून ३.८९ लाख रुपये वसूल.

झोन ६ : १ मालमत्ता सील; ४ मालमत्ताधारकांकडून ४.०९ लाख रुपये वसूल.

झोन ७ : १ मालमत्ता सील; ३ मालमत्ताधारकांकडून ४.७६ लाख रुपये वसूल.

झोन ८ : २ मालमत्ता सील; १ मालमत्ताधारकाकडून १.२२ लाख रुपये वसूल.

झोन ९ : २ मालमत्ता सील; ४ मालमत्ताधारकांकडून ३.५४ लाख रुपये वसूल.

झोन १० : १ मालमत्ता सील; १ मालमत्ताधारकाकडून १.९७ लाख रुपये वसूल.

महानगरपालिकेच्या पथकांनी दिवसभरात जवळपास ४३.७० लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला. थकीत कराची वसुली अधिक प्रभावी करण्यासाठी यापुढे दर गुरुवार आणि शुक्रवारी मोठ्या थकबाकीदारांविरोधात अशाच प्रकारे जप्ती व सीलची कारवाई करण्यात येणार असल्याचे मनपाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, थकीत मालमत्ता कर असलेल्या नागरिकांनी तातडीने कराचा भरणा करून मनपाची जप्तीची कारवाई आणि अन्य अप्रिय कार्यवाही टाळावी, असे आवाहन मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी केले आहे.

अखलाख देशमुख - महाराष्ट्र वाणी न्यूज