टीव्ही सेंटरमध्ये कॅन्डल मार्च; २६/११ च्या शहीद जवानांना भावपूर्ण अभिवादन!
पोलीस फॅमिली वेल्फेअर असोसिएशन आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गांचा संयुक्त उपक्रम; संविधानाच्या उद्दिष्टांचे वाचन, राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २६ :- मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूर जवानांना अभिवादन करण्यासाठी शहरातील टीव्ही सेंटर परिसरात कॅन्डल मार्च काढण्यात आला. पोलीस फॅमिली वेल्फेअर असोसिएशन आणि सिडको-हडको परिसरातील विविध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे व कोचिंग क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कॅन्डल मार्चमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींसह नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. हातात प्रज्वलित मेणबत्त्या घेऊन सहभागी झालेल्यांनी २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी भारतीय संविधानाच्या उद्दिष्टांचे सामूहिक वाचन करण्यात आले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाला माजी सहाय्यक पोलीस आयुक्त तथा जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरच्या समाजकल्याण विभागाचे विद्यमान सभापती बालाजी सोनटक्के प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. माजी नगरसेवक पूनमचंद बमणे यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन दीपक गोफणे यांनी केले.
यावेळी मार्गदर्शन करताना बालाजी सोनटक्के यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाचा अधिकार प्रदान करते. सर्व जाती-धर्मांच्या नागरिकांना एकत्र बांधून ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य संविधानाने केले आहे. त्यामुळे संविधानाच्या मूलभूत तत्त्वांचे संरक्षण करणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. संविधानाच्या मूल्यांना धक्का पोहोचेल, असे कोणतेही कृत्य होता कामा नये, असे आवाहन त्यांनी केले.
२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे बलिदान देश कधीही विसरणार नाही. त्यांच्या अतुलनीय शौर्याची आणि त्यागाची आठवण नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे, विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि संविधानाविषयी जागरूकता निर्माण करणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. विद्यार्थ्यांच्या मोठ्या सहभागामुळे या श्रद्धांजली कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित