जिल्हा परिषद उर्दू शाळांतील रिक्त शिक्षक पदे तात्काळ भरावीत – शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन
महाराष्ट्र वाणी न्युज
बुलढाणा (प्रतिनिधी) दि ११ :- जिल्हा परिषदेच्या उर्दू माध्यम शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षकांची पदे रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर आज अॅड. वसीम कुरेशी, अब्दुल बाबा हसन, आबीद कुरेशी, सय्यद वसीम आदी मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
सदर निवेदनात नमूद करण्यात आले की, पवित्र पोर्टलवर जाणीवपूर्वक रिक्त पदांची नोंद न करणाऱ्या शिक्षण अधिकाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी. आरटीई कायदा 2009 च्या कलम 25 नुसार पटसंख्यानुसार शिक्षकांची नेमणूक आवश्यक आहे. मात्र शासन निर्णय दिनांक 13 एप्रिल 2018 चा भंग होत असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले.
जिल्ह्यातील सर्व उर्दू शाळांमध्ये तात्काळ रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच 15 दिवसांच्या आत मागण्या मान्य न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल आणि याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशाराही देण्यात आला.
रिक्त शिक्षक पदांमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण हक्क धोक्यात आल्याने प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी एकमुखी मागणी उपस्थित मान्यवरांनी केली.