छोटी बचत, मोठी स्वप्ने! ५२ शाळांमधील ६० हजार विद्यार्थ्यांपर्यंत ‘पैसे वाचवा, पुस्तके वाचा’ अभियानाची धडक

मिर्झा कय्युम नदवी यांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांमध्ये बचत आणि वाचन संस्कृती रुजविण्याचा अनोखा उपक्रम; एक लाख गुल्लक वाटपाचे उद्दिष्ट

छोटी बचत, मोठी स्वप्ने! ५२ शाळांमधील ६० हजार विद्यार्थ्यांपर्यंत ‘पैसे वाचवा, पुस्तके वाचा’ अभियानाची धडक
छोटी बचत, मोठी स्वप्ने! ५२ शाळांमधील ६० हजार विद्यार्थ्यांपर्यंत ‘पैसे वाचवा, पुस्तके वाचा’ अभियानाची धडक

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ३० :- मुलांच्या हातात मोबाईलऐवजी पुस्तक आणि खर्च करण्याच्या सवयीऐवजी बचतीची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने रीड अँड लीड फाउंडेशन, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने राबविण्यात येणारा ‘पैसे वाचवा, पुस्तके वाचा’ हा उपक्रम विशेष लक्षवेधी ठरत आहे. या अभिनव अभियानाच्या माध्यमातून आतापर्यंत शहरातील आणि परिसरातील ५२ शाळांमधील ६० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यात यश आले आहे.

विश्व बचत दिनाचे औचित्य साधून या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच बचतीची सवय आणि वाचनाची आवड निर्माण करणे, हा या अभियानाचा मुख्य हेतू आहे.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना गुल्लक देऊन त्यामध्ये आपल्या खाऊच्या पैशांतून थोडी-थोडी रक्कम जमा करण्यास प्रोत्साहित केले जाते. जमा झालेल्या पैशांतून विद्यार्थी मराठी, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी भाषांमधील आपल्या आवडीची पुस्तके खरेदी करतात. त्यामुळे बचतीसोबतच स्वतःच्या पैशांतून पुस्तक खरेदी करण्याचा आनंद आणि वाचनाची गोडीही मुलांमध्ये निर्माण होत आहे.

रीड अँड लीड फाउंडेशनचे मिर्झा अब्दुल कय्युम नदवी यांच्या मार्गदर्शनातून राबविण्यात येणारा हा उपक्रम केवळ बचतीपुरता मर्यादित नसून मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी आणि ज्ञानसमृद्ध पिढी घडविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे.

या अभियानाचा संबंध ‘मरियम मिर्झा मोहल्ला पुस्तकालय आंदोलनाशी’देखील जोडलेला आहे. समाजातील सर्व स्तरांतील मुलांपर्यंत पुस्तके पोहोचविणे, वाचनाची संस्कृती विकसित करणे आणि ज्ञानाची समान संधी उपलब्ध करून देणे, यासाठी या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत.

या उपक्रमाचे भविष्यातील उद्दिष्ट आणखी व्यापक असून, येत्या काळात तब्बल एक लाख गुल्लक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे स्वप्न फाउंडेशनने ठेवले आहे. प्रत्येक मुलामध्ये बचतीची शिस्त, वाचनाची आवड, स्वतंत्र विचार करण्याची क्षमता आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण व्हावी, हा या अभियानामागील व्यापक दृष्टिकोन आहे.

‘प्रत्येक नाणे एका नव्या पुस्तकाकडे आणि प्रत्येक पुस्तक उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाते,’ हा संदेश देणारा हा उपक्रम बालवयातच मुलांना आर्थिक शिस्त आणि ज्ञानाची खरी श्रीमंती शिकविणारा प्रेरणादायी आदर्श ठरत आहे.

प्रस्तुती : मिर्झा अब्दुल कय्युम नदवी

रीड अँड लीड फाउंडेशन, छत्रपती संभाजीनगर.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित