चोरटी विक्रीसाठी गांजा बाळगणाऱ्या दोन महिला व एका इसमास अटक!NDPS सेल व करमाड पोलीस ठाण्याची संयुक्त कारवाई; 31 किलो गांजा जप्त
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २६ :- चोरट्या पद्धतीने गांजाची विक्री करणाऱ्या दोन महिला व एका इसमाला NDPS सेल व करमाड पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने अटक केली आहे. या कारवाईत एकूण 31 किलो 411 ग्रॅम गांजा, रोख रक्कम व मोटारसायकल असा सुमारे 10 लाख 41 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी NDPS सेलच्या अधिकाऱ्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, करमाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे कुभेफळ शिवारात, हॉटेल तोरणा समोरील मोकळ्या जागेत एका कापडी पालाखाली महिलांकडून गांजाची विनापरवाना विक्री सुरू आहे. या खात्रीशीर माहितीनुसार NDPS सेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर गोरे यांनी वरिष्ठांच्या आदेशाने छाप्याचे नियोजन केले.
पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांना माहिती देऊन NDPS सेल व करमाड पोलीस ठाण्याच्या पथकाने दोन पंचांसह घटनास्थळी छापा टाकला. छाप्यादरम्यान दोन महिला आढळून आल्या. तपासणीदरम्यान एका पोत्यात 21 किलो 495 ग्रॅम गांजा सापडला.
अधिक चौकशीत संबंधित महिलांनी सांगितले की, मुनिरखॉ हयातखॉ हा इसम मोटारसायकलवर गांजाची विक्री करण्यासाठी जालना रोडच्या दिशेने गेला आहे. करमाड परिसरात शोध घेतला असता तो मौजे शेकटा येथे मिळून आला. त्याच्या ताब्यातील पोत्यामधून गांजा जप्त करण्यात आला.
फॉरेन्सिक तपासणीत सदर मुद्देमाल गांजा असल्याचे निष्पन्न झाले. दोन्ही ठिकाणी मिळून आलेल्या गांजाचे एकूण वजन 31 किलो 411 ग्रॅम असून त्याची किंमत 9,42,330 रुपये आहे. याशिवाय 74,450 रुपये रोख व 25,000 रुपये किमतीची मोटारसायकल असा एकूण 10,41,780 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अटक आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत —
चंद्रकला उर्फ चंदाबाई शेषराव पवार (वय 52, रा. मांडणा, ता. सिल्लोड)
धुप्रदाबाई सुभाष मोहिते (वय 55, रा. अंबेटाकळी, ता. खामगाव, जि. बुलढाणा)
मुनिरखॉ हयातखॉ (वय 45, रा. नादुरा, जि. बुलढाणा)
या प्रकरणी करमाड पोलीस ठाण्यात गु.र.नं. 538/2025 अन्वये NDPS कायदा कलम 8(क), 20(ब)(ii)(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप चौरे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार मे. राठोड, अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
दरम्यान, अंमली पदार्थांबाबत कोणतीही माहिती असल्यास NDPS सेल – 9175777646 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक कार्यालय, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांनी केले आहे.
👉 अंमली पदार्थांविरोधातील लढ्यात पोलीस प्रशासन सज्ज – नागरिकांचे सहकार्य गरजेचे!