कुणबी जात प्रमाणपत्रासाठी नागरिकांना दिलासा; जिल्हाधिकारी कार्यालयाची हेल्पलाईन सुरू
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. १५ : मराठवाड्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा तसेच कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेसंदर्भात नागरिकांना मार्गदर्शन मिळावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने विशेष हेल्पलाईन सुरू केली आहे.
मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासननिर्णयानुसार हैदराबाद गॅझेटियरमधील नोंदींचा आधार घेऊन पात्र व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा व कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.
या प्रक्रियेदरम्यान नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे ०२४०-२९८८०७७ हा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील पात्र नागरिकांनी संबंधित उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत. अर्ज प्रक्रियेत कोणतीही अडचण आल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
वाचत रहा महाराष्ट्र वाणी — आपल्या हक्काच्या बातम्या, सर्वात आधी!