करमाडमध्ये गुटख्याची मोठी खेप पकडली; ५५.१९ लाखांचा मुद्देमाल जप्त!

जयपूर टोलनाक्यावर पोलिसांचा सापळा; ट्रक न थांबविता पळण्याचा प्रयत्न करणारे दोघे ताब्यात

करमाडमध्ये गुटख्याची मोठी खेप पकडली; ५५.१९ लाखांचा मुद्देमाल जप्त!
करमाडमध्ये गुटख्याची मोठी खेप पकडली; ५५.१९ लाखांचा मुद्देमाल जप्त!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ३० :- अमरावतीहून छत्रपती संभाजीनगरकडे आयशर ट्रकमधून प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच करमाड पोलिसांनी मोठी कारवाई केली. समृद्धी महामार्गावरील जयपूर टोलनाक्याजवळ सापळा रचून पोलिसांनी ५५ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये प्रतिबंधित पान मसाला, तंबाखूजन्य पदार्थ आणि आयशर ट्रकचा समावेश आहे.

दि. ३० सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे सुमारे ५.५० वाजता MH-46-BF-4235 क्रमांकाचा आयशर ट्रक पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा केला असता चालकाने ट्रक न थांबविता वेगाने पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून जयपूर टोलनाका एक्झिट पॉईंटजवळ ट्रक अडविला.

ट्रकमधील दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांची नावे इस्माईल खैराती शेख (३६) आणि अकील खलील शेख (३६) अशी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ट्रकची झडती घेतल्यानंतर त्यामध्ये ३० लाख ६० हजार रुपये किमतीचा Royal Blended बाजीराव सुगंधित पान मसाला आढळून आला. त्यामध्ये एकूण १५,३०० पुडे होते. तसेच ४ लाख ५९ हजार रुपये किमतीचा MASTANI-216 Premium Chewing Tobacco आढळून आला असून त्याचेही १५,३०० पुडे जप्त करण्यात आले.

अशा प्रकारे पान मसाला व तंबाखूजन्य पदार्थांचे एकूण ३०,६०० पुडे जप्त करण्यात आले. यासोबतच सुमारे २० लाख रुपये किमतीचा आयशर ट्रक ताब्यात घेण्यात आला. त्यामुळे जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ५५ लाख १९ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले.

पोलिसांच्या चौकशीत हा माल अमरावती येथील जावेद हुरूप मेमन यांच्याकडून घेतल्याचे सांगण्यात आले. तसेच हा माल छत्रपती संभाजीनगर येथील अंजिठा किराणा स्टोअर्सचे मालक सय्यद वाजेद सय्यद फारुख यांच्याकडे पोहोचविण्यास सांगण्यात आल्याचेही चौकशीत समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

या प्रकरणी करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ४७१/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेतील कलम २७५, २२३, १२३ तसेच अन्न व सुरक्षा मानके अधिनियम-२००६ मधील सहकलम ५९ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत, सहायक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर तसेच करमाड पोलिसांच्या पथकाने केली.

अखलाख देशमुख - महाराष्ट्र वाणी न्यूज