एच.पी.सी.एल.तर्फे स्कॉलरशिप कार्यशाळा संपन्न; कौशल्याधिष्ठित शिक्षणावर भर – प्राचार्य मून
महाराष्ट्र वाणी न्यूज
छ. संभाजीनगर(औरंगाबाद) दि २९ जुलै :- अजिंठा शिक्षण संस्था संचलित पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालय येथे दिनांक 29 जुलै 2025 रोजी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एच.पी.सी.एल.) यांच्या वतीने पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख एल. यु. मेश्राम यांनी केले. यानंतर एच.पी.सी.एल.चे डी.जी.एम. विशाल शर्मा (छत्रपती संभाजीनगर विभाग) यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. त्यांनी विद्यार्थ्यांना क्रूड ऑइलपासून पेट्रोल पंपावर येणाऱ्या अंतिम इंधन प्रक्रियेची सखोल माहिती दिली. सीएसआयआर फंडामार्फत मागील वर्षी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली गेली असल्याचे त्यांनी नमूद केले.
यानंतर मानव संसाधन विभागाचे मुख्य व्यवस्थापक अमित भासारकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पारंपरिक शिक्षण प्रणाली कालबाह्य होत असून, कौशल्याधारित (Skill-based) शिक्षण ही काळाची गरज असल्याचे ठामपणे सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय मून यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना मागील दशकातील शैक्षणिक बदल अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, “भारताची 67% लोकसंख्या ही युवकांची असून, त्यांच्या प्रगतीसाठी कौशल्याधिष्ठित शिक्षण आवश्यक आहे.” याच अनुषंगाने महाविद्यालय व एच.पी.सी.एल. यांच्यात सामंजस्य करार (MoU) होऊन एक अभ्यासक्रम तयार व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या कार्यशाळेस एच.पी.सी.एल. अधिकारी दीपांशी पांडे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य एस. आर. मंझा, प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, मागील वर्षी स्कॉलरशिप लाभार्थी विद्यार्थी तसेच नवीन प्रवेशित विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजू तुपे यांनी केले, तर आभार उपप्राचार्य मंझा यांनी मानले.
👉 अशाच शैक्षणिक घडामोडींसाठी वाचत राहा - महाराष्ट्र वाणी!