इकरा एच. जे. थीम महाविद्यालयात उच्च शिक्षणाच्या नव्या संधींवर राष्ट्रीय परिसंवाद; MANUU सोबत सामंजस्य करार
जळगाव दि २८ :- इकरा एज्युकेशन सोसायटीच्या एच. जे. थीम कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, मेहरूण, जळगाव येथे मौलाना आझाद नॅशनल उर्दू युनिव्हर्सिटी (MANUU)च्या केंद्राच्या सहकार्याने ‘औपचारिक, दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण तसेच कौशल्य व क्षमता विकास’ या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय परिसंवाद आणि ओरिएंटेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे एच. जे. थीम महाविद्यालय आणि हैदराबाद येथील मौलाना आझाद नॅशनल उर्दू युनिव्हर्सिटी यांच्यात शैक्षणिक सहकार्यासाठी सामंजस्य करार (MOU) करण्यात आला. या करारामुळे दोन्ही संस्थांमधील शैक्षणिक सहकार्याला अधिक चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात प्रा. डॉ. अख्तर शाह यांच्या कुराण पठणाने झाली. त्यानंतर डॉ. तनवीर खान यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका व उद्दिष्टे स्पष्ट केली. अध्यक्षीय अनुमोदन प्रा. डॉ. मुस्तकीम बागवान यांनी केले. यावेळी ‘तराना-ए-इकरा’ सादर करण्यात आले.
इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. मौलाना आझाद नॅशनल उर्दू युनिव्हर्सिटीचे संचालक रझाउल्ला खान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुंबई येथील डॉ. अब्दुल बरकात आणि डॉ. निसार अहमद पीरजादा हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
याशिवाय डॉ. इफ्रान इक्बाल, सईदा वकील, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. तनवीर खान, प्रा. अंजली कुलकर्णी तसेच प्राचार्य प्रा. डॉ. विकार शेख यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
उच्च शिक्षणातील संधींवर मार्गदर्शन
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मौलाना मुजम्मिल काझी यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकार शेख यांनी परिसंवादाच्या आयोजनामागील उद्देश आणि विद्यार्थ्यांसाठी त्याचे महत्त्व स्पष्ट केले.
डॉ. अब्दुल बरकात यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत उच्च शिक्षणातील बदलत्या प्रवाहांवर आपले विचार मांडले. प्रमुख पाहुणे रझाउल्ला खान यांनी उच्च शिक्षणातील उपलब्ध विविध संधी, औपचारिक शिक्षणासोबतच दूरस्थ व ऑनलाइन शिक्षणाचे महत्त्व आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसमोरील करिअरच्या शक्यतांवर सविस्तर मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी उपलब्ध संधींचा लाभ घ्यावा : डॉ. अब्दुल करीम
अध्यक्षीय भाषणात इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार यांनी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या उपलब्ध संधींचा योग्य उपयोग करण्याचे आवाहन केले. उच्च शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणत ज्ञान, कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकासावर भर द्यावा, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या समारोपावेळी प्रा. डॉ. चांद खान यांनी उपस्थितांचे आभार मानले. या राष्ट्रीय परिसंवादाला बी.एड. महाविद्यालयाचे प्राचार्य व कर्मचारी, एच. जे. थीम महाविद्यालयातील प्राचार्य व प्राध्यापक, डी.एड. महाविद्यालयाचे प्राचार्य व कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
— महाराष्ट्र वाणी न्यूज सत्यासाठी निर्भीड | जनतेसाठी समर्पित