अंशतः अनुदानित शाळेच्या शिक्षकांची दिवाळी होणार गोड – आमदार विक्रम काळे यांचे प्रयत्न फलद्रूप

अंशतः अनुदानित शाळेच्या शिक्षकांची दिवाळी होणार गोड – आमदार विक्रम काळे यांचे प्रयत्न फलद्रूप
अंशतः अनुदानित शाळेच्या शिक्षकांची दिवाळी होणार गोड – आमदार विक्रम काळे यांचे प्रयत्न फलद्रूप

महाराष्ट्र वाणी न्युज 

मुंबई, दि. ७ :– राज्यातील अंशतः अनुदानित शाळांतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच वेतन मिळावे आणि सरकारने घेतलेल्या वाढीव २० टक्के अनुदानाच्या निर्णयाची अंमलबजावणी लवकर व्हावी यासाठी आमदार विक्रम काळे यांनी आज मंत्रालयात राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री मा. अजितदादा पवार यांची भेट घेतली.

या भेटीत आमदार काळे यांनी स्पष्टपणे सांगितले की, १८ ऑक्टोबरपासून दिवाळी सुरू होत आहे, त्यामुळे सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याचे आगाऊ वेतन मिळणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार अंशतः अनुदानित शाळांना देण्यात येणाऱ्या वाढीव २०% अनुदानाची अंमलबजावणी लवकर व्हावी, यासाठी आवश्यक असलेला वेतन निधी तत्काळ वितरित करण्यात यावा, अशी विनंतीही त्यांनी केली.

या चर्चेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ताबडतोब अर्थसचिवांना फोन करून संबंधित फायली मागवण्याचे आदेश दिले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, "आपल्याला हे मंजूर करायचे आहे, कारण यासंबंधीचा निर्णय मंत्रिमंडळात आधीच घेण्यात आलेला आहे."

या सकारात्मक हस्तक्षेपामुळे लवकरच निधी वितरित होण्याची शक्यता असून, राज्यातील हजारो अंशतः अनुदानित शाळांतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना याचा थेट लाभ होणार आहे. यामुळे त्यांच्या घरी दिवाळीचा आनंद द्विगुणित होणार आहे.

या वेळी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आणि माजी आमदार श्रीकांत देशपांडे हेही उपस्थित होते.