अंभईच्या विकासाला नवी दिशा! भूमिगत गटार योजनेच्या कामाचा शुभारंभ; अब्दुल आमेर अब्दुल सत्तार यांच्या हस्ते उद्घाटन

अंभईच्या विकासाला नवी दिशा! भूमिगत गटार योजनेच्या कामाचा शुभारंभ; अब्दुल आमेर अब्दुल सत्तार यांच्या हस्ते उद्घाटन
अंभईच्या विकासाला नवी दिशा! भूमिगत गटार योजनेच्या कामाचा शुभारंभ; अब्दुल आमेर अब्दुल सत्तार यांच्या हस्ते उद्घाटन

अंभई (प्रतिनिधी) दि १४ :- सिल्लोड तालुक्यातील अंभई गावाच्या पायाभूत सुविधांना बळकटी देण्याच्या दृष्टीने गावांतर्गत भूमिगत गटार योजनेच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हा परिषद सदस्य अब्दुल आमेर अब्दुल सत्तार यांच्या हस्ते या महत्त्वपूर्ण विकासकामाचे उद्घाटन करण्यात आले. या कामामुळे गावातील सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यासोबतच स्वच्छता आणि आरोग्य व्यवस्थेला मोठी मदत होणार आहे.

माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकारातून अंभई गावात विविध विकासकामे हाती घेण्यात येत आहेत. याच विकासदृष्टीतून भूमिगत गटार योजनेचे काम सुरू करण्यात आले आहे. उद्घाटनप्रसंगी अब्दुल आमेर अब्दुल सत्तार यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत गावातील विविध समस्या, प्रलंबित प्रश्न आणि नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेतल्या.

कामाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड नाही!

भूमिगत गटार योजनेचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासोबतच ते दर्जेदार पद्धतीने व्हावे, अशा स्पष्ट सूचना संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांना देण्यात आल्या. कामात कोणत्याही प्रकारची दिरंगाई किंवा गुणवत्तेबाबत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा ठाम इशाराही यावेळी देण्यात आला.

गावाच्या विकासासाठी केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कामांना सुरुवात करण्यावर भर दिला जात असून, भूमिगत गटार योजनेमुळे अंभईच्या स्वच्छता व्यवस्थेत सकारात्मक बदल घडण्याची अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

मान्यवरांची उपस्थिती

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दामू अण्णा गव्हाणे, पंचायत समिती सदस्या रजनीताई नगरे, उपसरपंच रईस देशमुख, बाजार समितीचे सचिव विश्वास पाटील, नगरसेवक शेख इम्रान (गुड्डू), बबलू पठाण, प्रमोद शिंदे, रितेश जयस्वाल, फय्याज देशमुख, अब्दुल करीम चेअरमन, फकीरा सेठ पठाण, समाधान भुईगळ, रुद्र आप्पा नगरे, मधुकर जाधव, अमोल नगरे, गंगाधर दांडगे, सय्यद मेहमूद, जगन्नाथ जाधव, शेख वाजेद, अनुप नगरे, रवींद्र गव्हाणे, पंकज जयस्वाल आदींसह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

महाराष्ट्र वाणी | 

सत्यासाठी निर्भीड | जनतेसाठी समर्पित