सिल्लोड-सोयगावच्या आरोग्य सुविधांना बळकटी देणार! आ. अब्दुल सत्तार यांची आरोग्य मंत्र्यांशी महत्वपूर्ण चर्चा

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) :आमदार अब्दुल सत्तार यांनी मुंबई येथे आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेत सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघातील आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणाबाबत सविस्तर चर्चा केली.

या भेटीदरम्यान सिल्लोड येथील 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, सोयगाव येथील 50 खाटांचे रुग्णालय तसेच फर्दापूर, अंभई, अजिंठा, भराडी, गेवराई सेमी आणि अंधारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये भेडसावणाऱ्या विविध समस्या मांडण्यात आल्या. विशेषतः मनुष्यबळाची कमतरता, नवीन पदनिर्मिती आणि आवश्यक सोयीसुविधांची गरज याकडे लक्ष वेधण्यात आले.

यावेळी आमदार प्रदीप जैस्वाल तसेच आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सत्तार यांनी मतदारसंघातील आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.

दरम्यान, आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांनी या सर्व मुद्द्यांवर सकारात्मक भूमिका घेत लवकरच संबंधित विभागीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेऊन आवश्यक निर्णय करण्यात येतील, असे आश्वासन दिले.

आता आरोग्य सुविधांतील उणिवा भरून निघणार का? सिल्लोड-सोयगावकरांची नजर पुढील निर्णयांकडे लागली आहे…