"शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा!गावागावात पीक कर्ज शिबिरे – जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश!

"शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा!गावागावात पीक कर्ज शिबिरे – जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश!

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. २४ :- खरीप हंगाम सुरू असूनही जिल्ह्यात केवळ ४२ टक्केच पीक कर्जाचे वितरण झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे मागील कर्जाचे नुतनीकरण बाकी असून, नव्याने कर्ज देण्यात बँकांना अडचणी येत आहेत. ही परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी गावपातळीवर पीक कर्ज शिबिरांचे आयोजन करण्याचे निर्देश दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बँक अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला जिल्हा उपनिबंधक समृत जाधव, अग्रणी बँकेचे प्रेषित मोघे, श्रीमती उषा पवार आणि सर्व बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्ह्यातील १.५४ लाख शेतकऱ्यांसाठी १५९६ कोटींचे कर्ज उद्दिष्ट असतानाही आतापर्यंत केवळ ६३० कोटीच वाटप झाले आहे. १.८७ लाख शेतकऱ्यांचे नुतनीकरण अद्याप प्रलंबित आहे. यावर उपाय म्हणून प्रत्येक गावात त्या गावातील संबंधित बँकेने महसूल, कृषी व सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांसह शिबिर आयोजित करावे, असे आदेश देण्यात आले आहेत.

"शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज मिळावे यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे. आवश्यक असल्यास पोलीस बंदोबस्तही देण्याचा विचार सुरू आहे," असे जिल्हाधिकारी स्वामी यांनी स्पष्ट केले.

हा निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा असून खरीप हंगाम सुरळीत पार पडण्यास मदत होणार आहे.

📲 अशाच शेतकरीहिताच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी भेट देत राहा आमचं पोर्टल!

🌱 खऱ्या प्रश्नांची खरी बातमी – थेट तुमच्या मोबाईलवर!