“शेतकऱ्यांचा आवाज दाबणारांना किसान काँग्रेसचा इशारा!” पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १८ :- डिपीसी बैठकीत मका व कापूस खरेदीसंदर्भातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलत असताना पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी विरोधकांना रोखल्याचा आरोप करत किसान काँग्रेस आक्रमक झाली आहे. याच्या निषेधार्थ आज दुपारी किसान काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन छेडले. तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे प्रदेश सचिव अनिस पटेल, किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र रमंडवाल आणि अल्पसंख्यांक शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोईन इनामदार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान “शेतकऱ्यांना न्याय द्या”, “मक्का खरेदी तात्काळ सुरू करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
निवेदनात म्हटले आहे की, शासनाने मका खरेदीसाठी प्रतिक्विंटल २५०० रुपयांचा हमीभाव जाहीर केला असला तरी प्रत्यक्षात व्यापाऱ्यांकडून केवळ १२५० रुपये दराने मका खरेदी केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असून अनेक शेतकरी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत.
तसेच कापसालाही हमीभाव देण्याची मागणी करण्यात आली आहे. कांदा, कापूस आणि सोयाबीनच्या घसरलेल्या दरामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. मक्का खरेदी केंद्रांचा प्रश्न तातडीने सोडवून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी थांबवावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही किसान काँग्रेसने सरकारला दिला.
या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव अशोक डोळस, माजी सभापती अॅड. इक्बालसिंग गिल, संतोष शेजवळ, अभिषेक शिंदे, शेख कैसर बाबा, असमत खान, अनिताताई भंडारी, हेमाताई पाटील, अरुणा लांडगे, जखिया बाजी, सुभाष देवकर, नदीम सौदागर, साजिद कुरेशी, महेश वैद्य, सलीम पटेल, शाहिद खान, डॉ. सिकंदर शेख, जसबीरसिंग सोडी, अजमल खान, सय्यद युनूस, सोमीनाथ पळसकर, सुदाम ढाकणे, शिवाजी दांडगे यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“शेतकऱ्यांच्या हक्कासाठीचा लढा आता आणखी तीव्र होणार का? राज्याच्या राजकारणात या आंदोलनाचे पडसाद उमटण्याची चिन्हे दिसत आहेत.”