वृद्धांच्या सेवेसाठी '१४५६७' हेल्पलाईन – एक आधारवड!

राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था व राज्य सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही मोफत सेवा सुरू

वृद्धांच्या सेवेसाठी '१४५६७' हेल्पलाईन – एक आधारवड!

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. ७ जुलै :– ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांवर तात्काळ उपाय व मार्गदर्शन देणारी ‘१४५६७’ ही राष्ट्रीय हेल्पलाईन सेवा आता देशभर सुरू करण्यात आली आहे. सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय, राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था व राज्य सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही मोफत सेवा सुरू असून, ऑगस्ट २०२१ पासून ती कार्यरत आहे.

या हेल्पलाईनवर आतापर्यंत ४ लाखांहून अधिक कॉल्स प्राप्त झाले असून, ३० हजारांहून अधिक प्रकरणांत थेट मदतीसाठी स्थानिक पातळीवर कार्यवाही करण्यात आली आहे.

हेल्पलाईनद्वारे मिळणाऱ्या प्रमुख सेवा:

माहिती सेवा: आरोग्य, पोषण, निवारा, वृद्धाश्रम, डे केअर सेंटर याबाबत त्वरित माहिती.

मार्गदर्शन सेवा: कायदेशीर सल्ला, कौटुंबिक व मालमत्ताविषयक वाद, पेन्शन योजना व "ज्येष्ठ नागरिक अधिनियम २००७" बाबत माहिती.

भावनिक आधार: मानसिक आरोग्य, ताण, राग यावरील समुपदेशन.

मदत आणि पुनर्वसन: अत्याचारग्रस्त किंवा बेघर वृद्धांसाठी तातडीची मदत, कुटुंबाशी संवाद, पोलीस अथवा अन्य यंत्रणेशी समन्वय.

१४५६७ हा क्रमांक डायल करून वयोवृद्ध नागरिक आपल्या अडचणी सांगू शकतात व विनामूल्य सेवा घेऊ शकतात. ही सेवा २४ तास सुरु असते.

सांभाळा वयोवृद्धांना, जोपासा संस्कृतीची मुळं!

— आपल्याही घरातील आजी-आजोबांना ही माहिती जरूर द्या.