“मेलोडी खाओ... सब भूल जाओ!” महागाईविरोधात युवक काँग्रेसचा पेट्रोल पंपावर अनोखा एल्गार
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. २९ :- वाढती महागाई, पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांविरोधात छत्रपती संभाजीनगर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने आज शहरातील पेट्रोल पंपावर अनोखे आंदोलन करण्यात आले. “मेलोडी खाओ... सब भूल जाओ!” असा उपरोधिक संदेश देत नागरिकांना “मेलोडी” चॉकलेटचे वाटप करून केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवण्यात आला.
हे आंदोलन महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सहप्रभारी नवज्योत सिंह संधू यांच्या नेतृत्वाखाली तसेच प्रदेश उपाध्यक्ष आमेर अब्दुल सलीम यांच्या उपस्थितीत पार पडले. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाध्यक्ष विश्वास औताडे यांनी केले होते.
यावेळी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सैयद अक्रम, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष सागर नागरे, महाराष्ट्र युवक काँग्रेस महासचिव अजय डिडोर, सचिव इरफान पठाण, गुरमीत गिल, दीपक कणसे, सुमेध नारणावारे आणि सुफियान लियाकत पठाण आदी उपस्थित होते.
आंदोलनादरम्यान केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. वाढत्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडले असून महागाईमुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडल्याचा आरोप युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
“पेट्रोल-डिझेलच्या सतत वाढणाऱ्या किंमतींमुळे वाहतूक, अन्नधान्य आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे दर वाढले असून सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. केंद्र सरकारने तात्काळ इंधन दर कमी करून जनतेला दिलासा द्यावा,” अशी मागणी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.
— “महागाईवर मेलोडी नाही, उपाय हवा!” अशी प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे.