मनपा निवडणूक : वंचित बहुजन आघाडीचा नवा इतिहास – एकही उमेदवारी अर्ज मागे नाही
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २ :- महानगरपालिका 2025–26 निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने एकूण 70 उमेदवार उभे केले होते. त्यापैकी प्रभाग क्रमांक 3, 7, 25, 26 व 27 मधील उमेदवारांचे अर्ज काही तांत्रिक कारणास्तव बाद झाले. फॉर्म छाननीनंतर वंचित बहुजन आघाडीचे 62 उमेदवारी अर्ज अधिकृतरित्या वैध ठरले.
निवडणूक प्रक्रियेदरम्यान सर्वच पक्षांमध्ये उमेदवारांची पळवा-पळवी, धमक्या व आमिषाच्या आरोपांची चर्चा सुरू असताना, वंचित बहुजन आघाडीचा एकही उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आलेला नाही, हा शहराच्या राजकारणात नोंद घेण्यासारखा इतिहास ठरला आहे.
दरम्यान, प्रभाग क्रमांक 9 मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उमेदवार सांडू खंडू श्रीखंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत वंचित बहुजन आघाडीला जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच प्रभाग क्रमांक 11 मध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार इब्राहिम पटेल यांनी देखील आपला अर्ज मागे घेत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारास पाठिंबा दर्शविला आहे.
ज्या प्रभागांमध्ये वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिलेले नाहीत, त्या ठिकाणी स्थानिक पॅनलशी चर्चा करून अपक्ष उमेदवारांना पुरस्कृत करण्याबाबत पक्षात विचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
वंचित बहुजन आघाडीच्या या यशामागे पक्षाची सातत्यपूर्ण सामाजिक व राजकीय चळवळ कारणीभूत असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. आगामी प्रचाराच्या पार्श्वभूमीवर दिनांक 8 व 9 जानेवारी रोजी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या छत्रपती संभाजीनगर व औरंगाबाद शहरात जाहीर सभा व रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर व राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या देखील शहरात भव्य सभा होणार असल्याची माहिती जिल्हा निरीक्षक (पश्चिम) योगेश बन यांनी दिली.
— राजकारणातील सत्तासंघर्षात वंचित बहुजन आघाडीने दाखवलेली संघटनेची ताकद शहराच्या राजकारणाला नवी दिशा देणारी ठरत आहे.