धडाकेबाज कारवाई! सराईत चोर पोलिसांच्या जाळ्यात — ९ गुन्हे उघड, लाखोंचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ८ :- घरफोडी, जबरी चोरी आणि वाहन चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला वाळूज पोलिसांनी अटक करत मोठा गुन्हेगारी पर्दाफाश केला आहे. आरोपीकडून तब्बल ९ गुन्हे उघडकीस आले असून ३ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वाळूज पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक 72/2026 अंतर्गत तपास करत असताना पोलीस उपनिरीक्षक अजय शितोळे आणि विशेष पथकाने आरोपी राहुल कांताराज पवार (रा. डोमेगाव) याचा शोध सुरू केला होता. आरोपी मिरजगाव, जामखेड, इंदापूर या भागात सतत ठिकाण बदलून पोलिसांना चकवा देत होता. अखेर २५ मार्च २०२६ रोजी इंदापूर येथून त्याला अटक करण्यात आली.
चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्यांची कबुली दिली असून त्याच्याकडून चांदीचे ब्रेसलेट, साड्या, विदेशी दारूच्या बाटल्या तसेच ३ मोटारसायकली असा एकूण ३,०७,२८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याशिवाय वाळूज, अंभोरा (बीड), वालचंदनगर (पुणे), नेवासा (अहिल्यानगर) आणि इचलकरंजी (कोल्हापूर) या ठिकाणचे एकूण ९ गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उपआयुक्त पंकज अतुलकर आणि सहायक पोलीस आयुक्त डॉ. भागीरथी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे, उपनिरीक्षक अजय शितोळे व त्यांच्या पथकाने पार पाडली.
👉 गुन्हेगार कितीही चलाख असला तरी कायद्याच्या पंजातून सुटत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं!