“तुमच्या शहराचे ‘बारामती’ करण्याचे राष्ट्रवादीचे स्वप्न!” – संभाजीनगरात बॅनरबाजीची जोरदार चर्चा

“तुमच्या शहराचे ‘बारामती’ करण्याचे राष्ट्रवादीचे स्वप्न!” – संभाजीनगरात बॅनरबाजीची जोरदार चर्चा
“तुमच्या शहराचे ‘बारामती’ करण्याचे राष्ट्रवादीचे स्वप्न!” – संभाजीनगरात बॅनरबाजीची जोरदार चर्चा

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. ४ —

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, प्रत्येक पक्ष आपल्या परीने प्रचाराच्या नव्या क्लृप्त्या लढवत आहे. अशाच एका लक्षवेधी बॅनरमुळे सध्या छत्रपती संभाजीनगरात जोरदार चर्चा रंगली आहे.

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शहरातील विविध भागांत “तुमच्या शहराचे बारामती करण्याचे राष्ट्रवादीचे बॅनर” झळकवण्यात आले आहेत. या बॅनरमधून बारामतीतील विकासाचा आदर्श छत्रपती संभाजीनगरमध्ये राबवण्याचा दावा करण्यात आला आहे. मराठवाड्याची राजधानी असलेले छत्रपती संभाजीनगर विकासाच्या बाबतीत बारामतीपेक्षा मागे असल्याचे सूचित करत, शहराला बारामतीसारखा सर्वांगीण विकास देण्याचा संदेश या बॅनरद्वारे देण्यात आला आहे.

या बॅनरवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोठे फोटो असून, “विकासाचा बारामती पॅटर्न” संभाजीनगरमध्ये आणण्याचा निर्धार स्पष्टपणे मांडण्यात आला आहे. त्यामुळे एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत प्रचाराला धार दिली असल्याचे चित्र आहे, तर दुसरीकडे विरोधी पक्षांकडून या बॅनरवरून टीका होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, या बॅनरबाजीबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र वाणीच्या प्रतिनिधींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिजीत देशमुख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते उपलब्ध न झाल्याने पक्षाची अधिकृत भूमिका समजू शकली नाही.

महानगरपालिका निवडणुकीत विकासाचा मुद्दा किती प्रभावी ठरणार आणि “बारामती पॅटर्न”चा दावा मतदारांवर कितपत परिणाम करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

— निवडणुकीच्या रणधुमाळीत असे बॅनर मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने झुकवणार, हे येणारा काळच ठरवेल!