“ठाकरे हाच ब्रँड!” – हिंदी सक्ती मागे घेताच संजय राऊतांचा टोला; राज ठाकरेंचीही तीव्र प्रतिक्रिया!

“ठाकरे हाच ब्रँड!” – हिंदी सक्ती मागे घेताच संजय राऊतांचा टोला; राज ठाकरेंचीही तीव्र प्रतिक्रिया!
“ठाकरे हाच ब्रँड!” – हिंदी सक्ती मागे घेताच संजय राऊतांचा टोला; राज ठाकरेंचीही तीव्र प्रतिक्रिया!

महाराष्ट्र वाणी न्युज 

मुंबई, २९ जून :- पहिलीपासून हिंदी शिकवण्याची सक्ती करणाऱ्या निर्णयाला अखेर राज्य सरकारनं माघार घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत हा निर्णय अधिकृतरीत्या मागे घेतल्याची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट भाष्य करत सरकारवर जोरदार टीका केली आहे.

संजय राऊतांचा निशाणा – ‘ठाकरे हाच ब्रँड!’

संजय राऊत यांनी एक्स (माजी ट्विटर) या सोशल मीडियावरून प्रतिक्रिया देताना म्हटलं की,

 “हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला गेला – हा मराठी अस्मितेचा विजय आहे. ठाकरे बंधूंचा मोर्चा होणार होता, म्हणूनच सरकारनं दबावाखाली निर्णय घेतला. मोर्चा आता होणार नसला तरी ‘ठाकरे’ हेच नाव पुरेसं आहे. फडणवीसांचा निर्णय योग्य, पण उशिरा आलेलं शहाणपण.”

राज ठाकरेंचा सडेतोड इशारा

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यासंदर्भात एक सविस्तर पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी सांगितले की,

 “सरकारनं हिंदी सक्तीचे दोन्ही GR रद्द केलेत, ही गोष्ट स्वागतार्ह असली तरी हा निर्णय मराठी जनतेच्या रेट्यामुळे झाला हे विसरता कामा नये. कोणत्या दबावामुळे सरकारनं आधी असा निर्णय घेतला, हे अजूनही गूढ आहे.”

ते पुढे म्हणाले –

 “आता नवीन समिती नेमण्यात आलीय. पण स्पष्ट सांगतो – या समितीचा अहवाल येणार की नाही, हे महत्त्वाचं नाही. अशा प्रकारांना पुढे चालू दिलं जाणार नाही. महाराष्ट्रातील जनतेनं एकजूट दाखवली, ही खरी विजयाची कारणं आहेत.”

राज ठाकरेंनी हेही सूचित केलं की,

 “हा मोर्चा झाला असता तर त्याची तुलना संयुक्त महाराष्ट्र चळवळीशी झाली असती. सरकारने त्याचाच धसका घेतला असावा. ही एकजूट अशीच कायम राहिली पाहिजे.”

 “भाषा, अस्मिता आणि आत्मसन्मानासाठी मराठी जनता पुन्हा जागी झाली आहे – ही लाट थांबू नये, हेच आजचं शिकवण आहे!”