जालन्यात काँग्रेसचा मेगा शक्तिप्रदर्शन! रशीद पैलवानांसह शेकडोंचा पक्षप्रवेश, सत्तासमीकरणात मोठा भूचाल
महाराष्ट्र वाणी न्युज
जालना दि २९ :- आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील सत्तासमीकरणाला मोठा कलाटणी देणारा काँग्रेसचा भव्य पक्षप्रवेश सोहळा आज उत्साहात पार पडला. काँग्रेसच्या राष्ट्रव्यापी विचारधारेवर विश्वास ठेवत श्री. रशीद पैलवान, पाच माजी नगरसेवक आणि शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
या कार्यक्रमाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खा. कल्याण काळे, प्रदेश उपाध्यक्ष अशोक पाटील निलंगेकर, राजेंद्र राख, कल्याण दळे, आतिक खान, जालना जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, तसेच छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर आणि शहराध्यक्ष युसूफ शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.
या मेगा प्रवेशामुळे काँग्रेसची संघटनात्मक ताकद जालन्यात आणखी मजबूत झाली असून, स्थानिक पातळीवर नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र या मेळाव्यात दिसून आले.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नवीन प्रवेशकर्त्यांचे स्वागत करताना सांगितले की,
"काँग्रेस ही लोकांच्या विश्वासाची ताकद आहे. न्याय, विकास आणि लोकशाहीमूल्यांसाठी काम करणाऱ्या सर्वांचे काँग्रेस परिवारात स्वागत आहे. आगामी राजकीय लढतीत आपण अधिक सक्षमपणे उभे राहू."
कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध भागांतून कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.