छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा बळकटीचा शॉट – शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा थेट प्रवेश!
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील महिला विकास मंडळ सभागृहात हा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
महाराष्ट्र वाणी न्युज
मुंबई(प्रतिनिधी)दि ८ जुलै:- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद, वैजापूर आणि गंगापूर तालुक्यातील विविध राजकीय पक्षांतील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील महिला विकास मंडळ सभागृहात हा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
या प्रवेशामुळे जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट होणार असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी हा पक्षप्रवेश निर्णायक ठरू शकतो.
या वेळी ज्येष्ठ नेते जगन्नाथ खोसरे, माजी जि.प. सदस्य सौ. शोभाताई खोसरे, खुलताबादचे माजी नगराध्यक्ष ॲड. कैसरोद्दीन जहिरोद्दीन, काँग्रेसचे शहराध्यक्ष सलीम जहागीरदार, वैजापूरचे माजी उपनगराध्यक्ष शेख अकिल, नबी पटेल, ज्ञानेश्वर सिदलंबे आदींसह अनेक दिग्गजांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
अजित पवार यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे. जात, धर्म, वंश न पाहता मेहनती कार्यकर्त्यांना संधी दिली जाते. त्यामुळे नवीन कार्यकर्त्यांनी संधीचं सोनं करावं.”
या पक्षप्रवेश सोहळ्याला आ. विक्रम काळे, आ. शिवाजीराव गर्जे, अभिजित देशमुख, स्वाती कोल्हे, गजानन फुलारे, संजय जाधव, संतोष कोल्हे यांच्यासह पक्षाचे अनेक मान्यवर उपस्थित होते.
विशेष म्हणजे हे सर्व पक्ष प्रवेश आमदार सतीश चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळे शक्य झाले असून त्यांच्या संघटन क्षमतेचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे.
पुढील निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादीची ही रणनिती किती यशस्वी ठरेल याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष!