"काम नाही तर वेतन नाही! ग्रामसेवकांना जिओ-टॅग फोटो अनिवार्य; कामचुकार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होणार"
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २९ :- पंचायत समिती, छत्रपती संभाजीनगर येथे 29 मे 2026 रोजी अधिकारी व ग्रामसेवकांच्या कार्यपद्धतीबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पंचायत समितीच्या वतीने संबंधित अधिकारी व ग्रामसेवकांना नोटीस बजावत कामकाजात शिस्त आणण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
यापुढे ग्रामसेवकांनी केलेल्या कामांचे जिओ-टॅग फोटो सादर केल्याशिवाय वेतन देऊ नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. विकासकामांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत असल्याची खात्री करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
यावेळी पंचायत समितीचे सभापती कल्याण पाटील गायकवाड यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना इशारा देत म्हटले की, अनेक ठिकाणी कर्मचारी आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडत नाहीत, शेतकऱ्यांचे प्रश्न वेळेत सोडवत नाहीत आणि कामकाजात टाळाटाळ करतात. अशा प्रकारांना यापुढे मोकळीक दिली जाणार नाही.
तसेच, कामकाजाबाबत जाब विचारल्यास काही कर्मचारी आमदार, खासदार किंवा इतर राजकीय व्यक्तींमार्फत दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. मात्र, अशा कोणत्याही वशिल्याला बळी न पडता कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई केली जाईल, असा कडक इशाराही त्यांनी दिला.
या निर्णयामुळे पंचायत समितीच्या कामकाजात अधिक पारदर्शकता येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांनाही गती मिळण्याची शक्यता आहे.
– महाराष्ट्र वाणी “जनतेच्या प्रश्नांवर थेट आणि निर्भीड आवाज!”