४० हजारांची लाच घेताना ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात; दलित वस्ती सुधार योजनेच्या बिलासाठी मागितली होती ‘कमिशन’!
महाराष्ट्र वाणी
कन्नड दि. ३ :- दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत पूर्ण केलेल्या पेवर ब्लॉक कामाचे बिल मंजूर करून धनादेश देण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना मकरनपूर येथील ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) विजय पिराजी जोंधळे (वय ४८) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे ग्रामपंचायत प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने मौजे रेल कनकावती नगर येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत पेवर ब्लॉकचे काम पूर्ण केले होते. या कामाचे एकूण बिल सुमारे ८ लाख २० हजार रुपये होते. संबंधित बिलाचा धनादेश काढून देण्यासाठी ग्रामसेवक विजय जोंधळे यांनी ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजीनगर येथे तक्रार दाखल केली. त्यानंतर एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता आरोपीने ४० हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तसेच तडजोडीनंतरही त्याने तीच रक्कम स्वीकारण्यास मान्यता दिली.
यानंतर ३ जून रोजी ग्रामपंचायत कार्यालय, मकरनपूर येथे एसीबीच्या पथकाने सापळा रचला. तक्रारदाराकडून ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताच पंच साक्षीदारांसमक्ष आरोपी विजय जोंधळे याला ताब्यात घेण्यात आले.
कारवाईदरम्यान आरोपीकडून ४० हजार रुपयांची लाच रक्कम तसेच वन प्लस कंपनीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण सुरू असून आरोपीच्या घराची झडती घेण्याची प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती एसीबीने दिली.
ही कारवाई पोलीस निरीक्षक शांतीलाल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक भास्कर नवले करीत आहेत. पोलीस अधीक्षक माधुरी केदार-कांगणे, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगारे आणि पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई पार पडली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी करत असल्यास त्वरित तक्रार करावी. यासाठी टोल फ्री क्रमांक १०६४ आणि व्हॉट्सॲप क्रमांक ७७२०८९१०६४ उपलब्ध आहेत.
👉 भ्रष्टाचाराविरोधातील लढ्यात नागरिकांनी पुढे येणे हीच स्वच्छ प्रशासनाची खरी ताकद आहे!