“१ जूनपर्यंत MARTI बाबत घोषणा करा, अन्यथा अल्पसंख्यांक विद्यार्थी रस्त्यावर उतरतील”- अॅड. वसीम कुरेशी यांचा शासनाला इशारा

“१ जूनपर्यंत MARTI बाबत घोषणा करा, अन्यथा अल्पसंख्यांक विद्यार्थी रस्त्यावर उतरतील”-  अॅड. वसीम कुरेशी यांचा शासनाला इशारा

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २१ :- महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या MARTI (मराठी रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट) योजनेबाबत राज्यभरात मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. आगामी शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना MARTI चा लाभ मिळणार की नाही, याबाबत शासनाकडून अद्याप कोणतीही स्पष्ट घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर MARTI कृती समितीचे सरचिटणीस अॅड. वसीम कुरेशी यांनी शासनाला थेट इशारा दिला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की,

“जर १ जून २०२६ पर्यंत शासनाने MARTI योजनेचा लाभ अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना मिळणार असल्याची अधिकृत घोषणा केली नाही, तर महाराष्ट्रभरातील अल्पसंख्यांक विद्यार्थी रस्त्यावर उतरतील.”

MARTI ही योजना अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि शैक्षणिक प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. अनेक विद्यार्थी या योजनेवर अवलंबून असल्याने शासनाचा निर्णय लांबणीवर पडल्यास हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कृती समितीच्या वतीने शासनाला तातडीने भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करू नये आणि शैक्षणिक हित लक्षात घेऊन त्वरित निर्णय जाहीर करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

दरम्यान, शासनाकडून यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नसली तरी, वाढता दबाव आणि विद्यार्थ्यांमधील असंतोष लक्षात घेता येत्या काही दिवसांत मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

“विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आता आंदोलनाच्या उंबरठ्यावर; शासनाची भूमिका काय असणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.”