सिल्लोड जिनिंगमध्ये CCI कापुस खरेदी तात्काळ सुरू करा; प्रति हेक्टर ३७.५ क्विंटल खरेदीची मागणी – खासदार डॉ. कल्याण काळेंचे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांना निवेदन

सिल्लोड जिनिंगमध्ये CCI कापुस खरेदी तात्काळ सुरू करा; प्रति हेक्टर ३७.५ क्विंटल खरेदीची मागणी – खासदार डॉ. कल्याण काळेंचे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांना निवेदन
सिल्लोड जिनिंगमध्ये CCI कापुस खरेदी तात्काळ सुरू करा; प्रति हेक्टर ३७.५ क्विंटल खरेदीची मागणी – खासदार डॉ. कल्याण काळेंचे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांना निवेदन

महाराष्ट्र वाणी 

जालना लोकसभा मतदारसंघातील सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत खासदार डॉ. कल्याण वैजिनाथराव काळे यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांना निवेदन सादर केले आहे. सिल्लोड तालुका शेतकरी सहकारी जिनिंगमध्ये CCI मार्फत कापुस खरेदी तात्काळ सुरू करण्यात यावी, तसेच महाराष्ट्राच्या सरासरी उत्पादकतेनुसार प्रति हेक्टर ३७.५ क्विंटल कपास खरेदी मान्य करावी, अशी ठोस मागणी त्यांनी केली आहे.

सुमारे पाच हजार शेतकऱ्यांच्या मालकीची असलेली सिल्लोड तालुका शेतकरी सहकारी जिनिंग संस्थेने CCI कपास खरेदीसाठी आवश्यक सर्व कायदेशीर, तांत्रिक व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केल्या असून ३० ऑक्टोबर २०२५ रोजी CCI सोबत विधिवत करार करण्यात आला आहे. करारानुसार ५ डिसेंबर २०२५ पासून खरेदी सुरू होणे अपेक्षित होते. मात्र अद्यापही खरेदी सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांकडे किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने कपास विकावा लागत आहे.

खासदार डॉ. काळे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, महाराष्ट्र राज्यात कापसाची सरासरी उत्पादकता प्रति एकर सुमारे १५ क्विंटल असून ती प्रति हेक्टर ३७.५ क्विंटल इतकी होते. असे असतानाही CCI कडून प्रत्यक्षात अत्यंत कमी खरेदी मर्यादा लागू केल्या जात असल्याने उत्पादनक्षम शेतकरीही आपल्या संपूर्ण उत्पादनाला MSP मिळवू शकत नाहीत. ही बाब शास्त्रीय कृषी वास्तवाला धरून नसून शेतकऱ्यांवर अन्याय करणारी आहे.

यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक नुकसान, वाहतूक खर्चाचा बोजा व मानसिक ताण वाढत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. सहकारी जिनिंग संस्थांना प्राधान्य देऊन शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांच्या शोषणापासून संरक्षण देणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

हा प्रश्न केवळ प्रशासकीय नसून हजारो शेतकऱ्यांच्या मेहनत, स्वाभिमान आणि उपजीविकेशी संबंधित असल्याचे सांगत, केंद्र सरकारने तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी खासदार डॉ. कल्याण काळे यांनी केली आहे.

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी संसदेतून थेट दिल्लीत आवाज उठत असून, आता केंद्र सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.