सासन रामापूरच्या शाळेत दरवर्षी पावसाचे पाणी शिरते; शाळेच्या इमारतींच्या पाया धोक्यात, स्थानिकांनी दिले निवेदन
महाराष्ट्र वाणी न्युज
दर्यापूर दि १ ऑगस्ट (प्रतिनिधी) :– दर्यापूर पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक विद्यालय सासन रामापूर व जिल्हा परिषद प्राथमिक मराठी विद्यालय (सासन) रामापूर या दोन्ही शाळांच्या परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, ही परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.
शाळेच्या परिसरात तीन ते चार फूट पाणी साचते आणि हेच पाणी वर्गखोल्यांमध्येही शिरते. परिणामी, विद्यार्थ्यांच्या ये-जा आणि शिक्षण प्रक्रियेवर मोठा परिणाम होत आहे. इतकेच नव्हे तर, दोन्ही शाळा इमारतींच्या पायाभूत रचनेवरही या पाण्याचा परिणाम होऊन पाया कमकुवत होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता धोक्यात येऊ नये म्हणून या समस्येच्या तातडीच्या उपाययोजनेसाठी स्थानिक ग्रामस्थ, पालक, शिक्षक आणि शिक्षाविदांनी पुढाकार घेतला आहे. शाळा व्यवस्थापन समिती, जी.प. उर्दू शाळा सासन रामापूर तसेच अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक सेलचे कार्यकारी अध्यक्ष मुमताज देशमुख यांनी संयुक्तपणे खासदार बलवंत भाऊ वानखडे, आमदार गजानन भाऊ लवटे, तालुका काँग्रेस अध्यक्ष सुधाकर भाऊ भारसाकळे, तसेच समूह विकास अधिकारी (दर्यापूर) यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.
या निवेदनात पावसाचे पाणी शाळेच्या परिसरात साचू नये यासाठी जलनिस्सारण व्यवस्था उभारण्याची तसेच शाळेच्या परिसराचे योग्य पातळीवर नुतनीकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या निवेदनाची गंभीर दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.
विद्यार्थ्यांचं शिक्षण आणि सुरक्षितता हेच खरे प्राथमिकता असावेत, त्यासाठी प्रशासन किती तत्पर ठरतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.