सरफराज सय्यद मॉब लिंचिंग प्रकरण तापले! SIT स्थापन करण्याची मागणी; पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि पोलीस अधीक्षकांची शिष्टमंडळाने घेतली भेट
निवेदनानंतर आणखी आरोपींना अटक; एकाही दोषीला सोडणार नाही, पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांची ग्वाही
जळगाव, दि. ११ :- जळगाव जिल्ह्यातील वरंगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत फुलगाव पुलाजवळ झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सरफराज सय्यद यांचा मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. या घटनेची मॉब लिंचिंग आणि पूर्वनियोजित हल्ल्याच्या संशयातून सखोल चौकशी करावी, सर्व आरोपींना तातडीने अटक करावी आणि स्वतंत्र विशेष तपास पथक (SIT) स्थापन करावे, या मागण्यांसाठी मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने ११ नोव्हेंबर रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांची भेट घेतली.
या प्रकरणात FIR क्रमांक 0267/2026 नोंदविण्यात आला आहे. सरफराज यांच्या मृत्यूनंतर या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन निष्पक्ष आणि पारदर्शक तपास व्हावा, अशी मागणी शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केली.
या शिष्टमंडळात करीम सालार, मुफ्ती हारून नदवी, एकता तंजीमचे संयोजक फारूक शेख, APCR चे आरिफ देशमुख, सिकलगार समाजाचे अन्वर खान, हुफ्फाज फाउंडेशनचे मौलाना गुफरान, समाजवादी पक्षाचे रिझवान शेख आणि साहिल शेख यांचा समावेश होता.
पालकमंत्र्यांचा पोलीस अधीक्षकांना फोन
शिष्टमंडळाने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची पालधी येथे भेट घेऊन घटनेची पार्श्वभूमी आणि तपासातील मागण्यांची माहिती दिली. निवेदनाचे गांभीर्य लक्षात घेऊन पालकमंत्र्यांनी तातडीने जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. तसेच शिष्टमंडळाला पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यास सांगितले.
त्यानंतर शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन लेखी निवेदन सादर केले. या प्रकरणाचा तपास स्वतंत्र SIT मार्फत करण्यात यावा, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा दाखला
निवेदनात सर्वोच्च न्यायालयाच्या १७ जुलै २०१८ रोजीच्या Tehseen S. Poonawalla Vs. Union of India या ऐतिहासिक निकालाचा संदर्भ देण्यात आला आहे. मॉब लिंचिंग आणि जमावाकडून होणारा हिंसाचार रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणीही करण्यात आली.
तसेच जळगाव जिल्ह्यातील जामनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेटावद खुर्द येथे सुलेमान रहीम खान पठाण यांच्या मॉब लिंचिंग प्रकरणात SIT स्थापन करण्यात आल्याचा दाखला देण्यात आला. त्या प्रकरणात विशेष तपास पथक स्थापन होऊ शकते, तर सरफराज सय्यद प्रकरणातही अशीच व्यवस्था का करण्यात येऊ नये, असा सवाल शिष्टमंडळाने उपस्थित केला.
आरोपींच्या अटकेबाबत पोलीस अधीक्षकांची माहिती
चर्चेदरम्यान FIR मध्ये आठ आरोपींची नावे अज्ञात म्हणून नोंदविण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी दिल्याचे शिष्टमंडळाकडून सांगण्यात आले.
शिष्टमंडळाच्या माहितीनुसार, ९ नोव्हेंबरपर्यंत दोन आरोपींना अटक झाली होती. त्यानंतर आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली. पुढील कारवाईत आणखी चार आरोपींना अटक केल्याची माहिती देण्यात आली.
SIT स्थापन करण्याच्या मागणीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल, असे पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले. सध्या या प्रकरणाचा तपास मुक्ताईनगरच्या पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, कोणत्याही आरोपीला पाठीशी घातले जाणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
फारूक शेख यांचा इशारा; न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच
एकता तंजीमचे संयोजक फारूक शेख यांनी या घटनेमागे दीड वर्षांपूर्वी खामखेडा येथे घडलेल्या घटनेचा बदला घेण्याच्या उद्देशाने पूर्वनियोजित आणि द्वेषभावनेतून हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला. या संशयाची निष्पक्षपणे चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
बेटावद येथील सुलेमान खान मॉब लिंचिंग प्रकरणानंतरही अशा स्वरूपाच्या घटना घडत असतील, तर ही चिंतेची बाब आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश केवळ कागदावर न राहता त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली पाहिजे, असेही फारूक शेख म्हणाले.
उर्वरित आरोपींना तातडीने अटक करणे, कोणत्याही दबावाशिवाय तपास करणे आणि स्वतंत्र SIT स्थापन करणे या मागण्या मान्य होईपर्यंत आमचा कायदेशीर लढा सुरूच राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
"आमचा लढा कोणत्याही समाजाच्या विरोधात नसून अन्यायाविरुद्ध आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आहे. आरोपी कोणत्याही समाजाचा असो, त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई झालीच पाहिजे," अशी भूमिका एकता तंजीमने स्पष्ट केली.
पालकमंत्री आणि पोलीस अधीक्षकांच्या भेटीनंतर तपासात काही प्रमाणात प्रगती झाली असली, तरी सर्व आरोपींना अटक होऊन पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले.
फोटो कॅप्शन :
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन देताना आणि प्रकरणाची माहिती देताना मुस्लिम समाजाचे शिष्टमंडळ.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांची भेट घेऊन SIT स्थापन करण्याची मागणी करणारे आरिफ देशमुख व शिष्टमंडळ.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित