संशयित गायीचे तूप जप्त; FDAची प्रसन्ना डेअरी अँड फूड्सवर कारवाई

संशयित गायीचे तूप जप्त; FDAची प्रसन्ना डेअरी अँड फूड्सवर कारवाई

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. ३ :- मा. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार अन्न व औषध प्रशासन (FDA), छत्रपती संभाजीनगर यांनी संशयित अन्नपदार्थांविरोधात धडक कारवाई करत गजानन नगर येथील प्रसन्ना डेअरी अँड फूड्स या आस्थापनातून सैल (लूज) गायीचे तूप जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या तुपाची अंदाजे किंमत १८ हजार १५० रुपये इतकी आहे.

या प्रकरणात प्रमोद नाथा निमसे (वय ३६) यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. संशयित अन्नपदार्थ असल्याच्या कारणावरून सैल गायीच्या तुपाचा साठा जप्त करण्यात आला असून त्याचे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत.

ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी एस. टी. जाधवर, कीर्तिका झाडे आणि योगेश चिभडे यांनी संयुक्तपणे केली. सदर कारवाई डी. व्ही. पाटील, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, छत्रपती संभाजीनगर तसेच एस. आर. करकळे, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थांचा वापर करण्याचे आवाहन केले असून भेसळयुक्त किंवा संशयित अन्नपदार्थांची माहिती प्रशासनाला देण्याचे आवाहन केले आहे.

👉 वाचत राहा ‘महाराष्ट्र वाणी’ – आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडींच्या विश्वासार्ह आणि ताज्या बातम्यांसाठी!