शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशाल रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ४ :- शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य मशाल रॅलीला आज मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली ही मशाल रॅली मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
रॅलीदरम्यान शिवसैनिकांनी मशाली हातात घेऊन जय भवानी... जय शिवाजी....शिवसेना जिंदाबाद...उद्धव ठाकरे साहेब आगे बढो...अशा जोरदार घोषणा दिल्या. जनतेतून मिळणारा वाढता प्रतिसाद आणि सहभाग पाहता शिवसेनेची छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत ताकद अधिक बळकट होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरलेला पक्ष असून, जनतेचा हा विश्वास आणि पाठिंबा आमच्यासाठी ऊर्जा देणारा आहे. येणाऱ्या काळात लोकहिताच्या प्रश्नांसाठी संघर्ष अधिक तीव्र केला जाईल, असे यावेळी अंबादास दानवे म्हणाले. या मशाल रॅलीत शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवासेना तसेच महिला आघाडीच्या मोठ्या संख्येने उपस्थितीमुळे कार्यक्रम यशस्वी ठरला.