शिक्षण सेवकांसाठी मोठी मागणी! मानधन दुप्पट करण्यासाठी आ. डॉ. प्रतापसिंह पाटील यांचे मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांना निवेदन
प्राथमिक शिक्षण सेवकांना ३२ हजार, माध्यमिकला ३६ हजार तर उच्च माध्यमिक शिक्षण सेवकांना ४० हजार रुपये मानधन देण्याची मागणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १५ :- राज्यातील शिक्षण सेवकांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेऊन त्यांच्या मासिक मानधनात दुप्पट वाढ करण्यात यावी, अशी मागणी विधान परिषद सदस्य तथा मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांना निवेदन सादर केले आहे.
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये कार्यरत असलेले शिक्षण सेवक शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी पार पाडत असताना त्यांना मात्र अत्यल्प मानधनावर काम करावे लागत आहे. वाढती महागाई, घरभाडे, प्रवास खर्च, मुलांचे शिक्षण, आरोग्यविषयक खर्च आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह या जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांची आर्थिक ओढाताण होत असल्याचे डॉ. पाटील यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.
सध्याच्या मानधनात दैनंदिन गरजा भागविणेही कठीण होत असल्याने शिक्षण सेवकांना दिलासा देण्यासाठी तातडीने मानधनवाढ करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
डॉ. पाटील यांनी शासनाकडे पुढीलप्रमाणे मानधनवाढीची मागणी केली आहे.
- प्राथमिक शिक्षण सेवक : सध्याचे १६ हजार रुपये → ३२ हजार रुपये.
- माध्यमिक शिक्षण सेवक : सध्याचे १८ हजार रुपये → ३६ हजार रुपये.
- उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण सेवक : सध्याचे २० हजार रुपये → ४० हजार रुपये.
या मागणीवर कार्यवाही करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने तातडीने प्रस्ताव तयार करून वित्त विभागाकडे आवश्यक मान्यतेसाठी पाठवावा, अशी सूचना त्यांनी केली आहे. वित्तीय मंजुरी मिळाल्यानंतर सुधारित मानधन लागू करण्यासाठी शासन निर्णय जारी करावा आणि राज्यातील पात्र व कार्यरत शिक्षण सेवकांना या वाढीचा लाभ लवकरात लवकर मिळावा, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
शिक्षण व्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असलेल्या शिक्षण सेवकांना त्यांच्या कामाच्या तुलनेत सन्मानजनक मानधन मिळणे आवश्यक आहे. त्यांच्या आर्थिक आणि कौटुंबिक परिस्थितीचा विचार करून राज्य सरकारने या मागणीबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र वाणी |
सत्यासाठी निर्भीड | जनतेसाठी समर्पित