राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून २ ते ८ ऑक्टोबरदरम्यान महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात ‘संविधान वाचवा – Save Democracy’ मार्चचे आयोजन

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून २ ते ८ ऑक्टोबरदरम्यान महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात ‘संविधान वाचवा – Save Democracy’ मार्चचे आयोजन

मुंबई दि ३० :- INDIA आघाडीच्या बैठकीत देशातील लोकशाही व्यवस्था, संविधानिक संस्था आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेसंदर्भात चर्चा झाल्यानंतर आता महाराष्ट्रात ‘संविधान वाचवा – Save Democracy’ आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना या आंदोलनात सक्रिय सहभाग घेण्याचे निर्देश दिले आहेत.

नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथे INDIA आघाडीतील प्रमुख नेत्यांची बैठक झाली. बैठकीला आघाडीतील १९ राजकीय पक्षांचे नेते तसेच अपक्ष खासदार कपिल सिब्बल उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राष्ट्रीय कार्याध्यक्ष व संसदीय पक्षनेत्या खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रीय सरचिटणीस तथा विधिमंडळ गटनेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सहभाग घेतला.

बैठकीत निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता, मतदारांचे अधिकार, लोकशाही संस्थांची स्वायत्तता आणि मुक्त व निष्पक्ष निवडणूक प्रक्रिया यासह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

२ ते ८ ऑक्टोबरदरम्यान जिल्हानिहाय ‘संविधान वाचवा’ मार्च

INDIA आघाडीच्या निर्णयानुसार २ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरीय ‘संविधान वाचवा – Save Democracy’ मार्च आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या माध्यमातून संविधानाचे संरक्षण, लोकशाही मूल्यांचे जतन आणि मतदारांच्या अधिकारांबाबत जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

याशिवाय INDIA आघाडीतर्फे देशभरात पाच मोठ्या रॅलींचे आयोजन करण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि मतदारांच्या अधिकारांशी संबंधित मुद्दे या रॅलींच्या माध्यमातून मांडले जाणार आहेत.

१ नोव्हेंबरला दिल्लीत महासभा

१ नोव्हेंबर २०२६ रोजी नवी दिल्ली येथे मोठ्या रॅलीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे पक्षाच्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. या रॅलीत निवडणूक प्रक्रियेशी संबंधित INDIA आघाडीने उपस्थित केलेले ‘मत चोरी’चे आरोप आणि मतदारांच्या अधिकारांशी निगडित प्रश्न मांडले जाणार आहेत.

दरम्यान, SIR संदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणांचा लवकरात लवकर निपटारा व्हावा, अशी मागणीही INDIA आघाडीने केली आहे.

जिल्हा पातळीवर तयारीचे निर्देश

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष तसेच विविध आघाड्या व विभागांच्या पदाधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवर तातडीने नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

INDIA आघाडीतील घटक पक्षांशी समन्वय साधून संयुक्त कार्यक्रमाचे नियोजन करावे, तसेच खासदार, आमदार, युवक, महिला, विद्यार्थी, कामगार आणि विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांना आंदोलनात सहभागी करून घ्यावे, असेही पक्षाने स्पष्ट केले आहे.

आंदोलनाचा उद्देश सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी बैठका, संवाद आणि जनजागृती कार्यक्रम घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रमांचे फोटो, व्हिडिओ तसेच तारीख, वेळ आणि सहभागी पदाधिकाऱ्यांची माहिती पक्ष संघटनेकडे सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

‘संविधानाची मूल्ये जपूया, लोकशाही अधिक मजबूत करूया’, या संदेशासह हे आंदोलन व्यापक करण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष शशिकांत ज. शिंदे यांनी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले आहे.

अखलाख देशमुख - महाराष्ट्र वाणी न्यूज