पहिल्याच प्रयत्नात ITBP मध्ये निवड; बोदवडच्या शेतकरी कन्येचा गावकऱ्यांकडून गौरव, आमदार अब्दुल सत्तार यांची उपस्थिती
महाराष्ट्र वाणी
सिल्लोड दि १९ :- सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील बोदवड (ता. सिल्लोड) येथील शेतकरी कन्या कु. मयुरी रामराव गव्हाणे हिने पहिल्याच प्रयत्नात इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात (ITBP) निवड होऊन गावाचे व तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल बोदवड गावकऱ्यांच्या वतीने नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या सत्कार समारंभास सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार हे आवर्जून उपस्थित राहिले. त्यांनी कु. मयुरी गव्हाणे हिचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. यावेळी मयुरीचे वडील रामराव गव्हाणे व आई वंदनाताई यांचाही आमदार सत्तार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुलीच्या यशामागे पालकांचे परिश्रम, त्याग आणि संस्कार महत्त्वाचे असतात, असे प्रतिपादन आमदार सत्तार यांनी यावेळी केले.
शेतकरी कुटुंबातील मुलीने प्रतिकूल परिस्थितीत जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर ITBP सारख्या देशसेवेच्या दलात स्थान मिळवणे हे संपूर्ण गावासाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. मयुरीने ग्रामीण भागातील तरुण-तरुणींना, विशेषतः मुलींना प्रेरणा दिली असून तिचा आदर्श इतरांनीही घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
सत्काराला उत्तर देताना कु. मयुरी गव्हाणे हिने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, शिक्षक, मार्गदर्शक तसेच गावकऱ्यांच्या पाठिंब्याला दिले. देशसेवेची संधी मिळाल्याचा अभिमान असून, जबाबदारीची जाणीव ठेवून कर्तव्य बजावेन, असा विश्वास तिने व्यक्त केला.
या कार्यक्रमास ग्रामस्थ, युवक-युवती, सामाजिक कार्यकर्ते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण गावात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण पाहायला मिळाले.
— अशाच प्रेरणादायी यशोगाथांसाठी आमच्यासोबत जोडलेले रहा.