नांदूर मधमेश्वर लाभक्षेत्राला रब्बीची दोन, उन्हाळ्यात एक आवर्तन; पहिल्या आवर्तनात दोन टीएमसी पाण्याची शक्यता!शेतकऱ्यांच्या मागणीला जलसंपदामंत्री विखे पाटील यांचा सकारात्मक प्रतिसाद

नांदूर मधमेश्वर लाभक्षेत्राला रब्बीची दोन, उन्हाळ्यात एक आवर्तन; पहिल्या आवर्तनात दोन टीएमसी पाण्याची शक्यता!शेतकऱ्यांच्या मागणीला जलसंपदामंत्री विखे पाटील यांचा सकारात्मक प्रतिसाद
नांदूर मधमेश्वर लाभक्षेत्राला रब्बीची दोन, उन्हाळ्यात एक आवर्तन; पहिल्या आवर्तनात दोन टीएमसी पाण्याची शक्यता!शेतकऱ्यांच्या मागणीला जलसंपदामंत्री विखे पाटील यांचा सकारात्मक प्रतिसाद

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २ :- नांदूर मधमेश्वर प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामात दोन आणि उन्हाळी हंगामात एक, अशी एकूण तीन आवर्तने देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, पहिल्या आवर्तनासाठी प्रस्तावित एक टीएमसी पाणी अपुरे पडण्याची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सुमारे दोन टीएमसीपर्यंत वाढीव पाणी उपलब्ध करून देण्याबाबत जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयात जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नांदूर मधमेश्वर प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली. यावेळी लोकप्रतिनिधींनी दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांची सिंचनाची गरज लक्षात घेऊन पहिल्या आवर्तनात वाढीव पाणी देण्याची मागणी केली.

तीन आवर्तनांचे नियोजन

जलसंपदा विभागाने सादर केलेल्या नियोजनानुसार, रब्बी हंगामातील पहिले आवर्तन २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२६ या काळात एक टीएमसी पाण्याचे प्रस्तावित आहे. दुसरे आवर्तन १९ फेब्रुवारी ते १२ मार्च २०२७ या कालावधीत १.३५५ टीएमसी पाण्याचे नियोजित आहे. तर उन्हाळी हंगामातील आवर्तन २० एप्रिल ते १ मे २०२७ या कालावधीत देण्याचे नियोजन आहे.

पहिल्या आवर्तनात दोन टीएमसी पाण्याची मागणी

दुष्काळी परिस्थितीमुळे पहिल्या आवर्तनासाठी प्रस्तावित एक टीएमसी पाणी अपुरे ठरण्याची शक्यता लोकप्रतिनिधींनी बैठकीत व्यक्त केली. त्यामुळे हे आवर्तन सुमारे दोन टीएमसीपर्यंत वाढविण्याची मागणी करण्यात आली. यावर प्रत्यक्ष सिंचनाची गरज आणि उपलब्ध पाणीसाठा विचारात घेऊन वाढीव पाणी देण्याचे नियोजन करण्याचे निर्देश मंत्री विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले.

जानेवारीत पाणीसाठ्याचा फेरआढावा

पहिल्या आवर्तनानंतर जानेवारी महिन्यात धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा, सिंचनासाठी झालेला वापर आणि पुढील हंगामातील गरजांचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानुसार अतिरिक्त पाणी किंवा आणखी एक आवर्तन देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही मंत्र्यांनी स्पष्ट केले.

बैठकीत मुकणे, भाम, वाकी आणि बाभळी धरणांमधील पाण्याची उपलब्धता, विविध प्रकल्पांचे आरक्षण तसेच नांदूर मधमेश्वर लाभक्षेत्राच्या पाण्याच्या हिश्श्यावर चर्चा झाली.

पिण्याच्या पाण्याच्या आरक्षणाला बाधा न आणता शेतीसाठी पाण्याचे योग्य नियोजन करावे. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने आणि कार्यक्षमतेने वापर करून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा मिळवून द्यावा, अशा सूचनाही जलसंपदामंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

बैठकीस खासदार संदिपान भुमरे, आमदार प्रशांत बंब, रमेश बोरनारे, विठ्ठलराव लंघे पाटील, प्रतापसिंह पाटील, अंबादास दानवे, जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित